बोदरा तलावाची पाळ फुटल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:49+5:30
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोदरा येथे येऊन चौकशी व पाहणी केली. प्रस्ताव तयार केला. प्रशासकीय मान्यताही मिळाली. मात्र उर्वरीत प्रक्रिया तातडीने केले नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला उशिर झाला. परिणामी तलावाची पाळ फुटली व जवळच्या शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. एवढेच नाही तर तलावातील जवळपास दहा ते पंधरा लक्ष रुपयाचे मासे वाहून गेले. याला जबाबदार कोण? आधीच लॉकडाऊनमुळे जनतेचे हाल झाले.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे साकोली तालुक्यातील बोदरा येथील तलावाची पाळ फुटली. यामुळे तलावातील ९० टक्के पाणी आधीच वाहून गेले असून या तलावात दररोज पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. मात्र संबंधित विभागाने अजूनपर्यंत काहीच उपाययोजना न केल्यामुळे येणारे पाणीही तलावाबाहेर जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व मासेमार सहकारी संस्थांनी केली आहे.
या तलावाचे खोलीकरण करून तलावाच्या पाळीचे व तुडुमाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी असे निवेदन व माहिती गावकरी, मच्छीमार सोसायटी व जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी दिली होती. यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोदरा येथे येऊन चौकशी व पाहणी केली. प्रस्ताव तयार केला. प्रशासकीय मान्यताही मिळाली. मात्र उर्वरीत प्रक्रिया तातडीने केले नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला उशिर झाला. परिणामी तलावाची पाळ फुटली व जवळच्या शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. एवढेच नाही तर तलावातील जवळपास दहा ते पंधरा लक्ष रुपयाचे मासे वाहून गेले. याला जबाबदार कोण? आधीच लॉकडाऊनमुळे जनतेचे हाल झाले. त्यामुळे मासेमारी करणारे व शेतीवर आधारीत शेतकऱ्याचे मोठे हाल झाले आहे. सदर तलाव ३३ हेक्टर जमिनीत असून या तलावाच्या पाण्यापासून ५६ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होत होती. मात्र आता तलावात पाणीच शिल्लक नसल्याने यावर्षी शेतीला सिंचनाची समस्या उद्भवणार आहे.
साकोली तालुक्यातील बहुतेक तलाव माजी मालगुजारी तलाव आहेत. ही सर्व तलाव फार जुनी आहेत. बऱ्याच तलावातील गाळ काढणे, वेस्टवेअरची कामे, पाळ दुरुस्त करणे अशी कामे जलसंधारण विभागामार्फत करण्यात आली नाही. तलावांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक तलावांच्या पाळीची स्थिती भयावह आहे. तलावाच्या पुर्नविकासासाठी आतातरी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.
उन्हाळी शेतीचा प्रश्न भेडसावणार
बोदरा येथील फुटलेल्या तलावाच्या पाण्यावर उन्हाळी धानाची लागवड केली जात होती. मात्र यावर्षी तलावात पाणी शिल्लक नसल्याने पावसाळी व उन्हाळी धानाचे नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार जलसंधारण विभागच आहे. अशा प्रतिक्रिया शेतकरी व परिसरातील नागरिकांच्या आहेत.
बोदरा तलावाच्या पाळीची दुरुस्ती करण्यात यावी अशी माहिती लेखी स्वरुपात संबंधित विभागाला दोन वर्षापूर्वी दिली होती. तरीही पाळ दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पाळ फुटली. त्यामुळे मच्छीपालन संस्थेचे २० लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. या तलावावर मच्छीपालन सहकारी संस्थेच्या शेकडो सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
-हेमकृष्ण दिघोरे, अध्यक्ष, नवनाथ मच्छीपालन संस्था, बोदरा.
तलावाची पाळ दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी सतत दोन वर्षापासून जलसंधारण विभागाला पाठपुरावा करीत होतो. मात्र अधिकाºयांचा कामचुकारपणा व निष्काळजीपणा या तलावाच्या पाळ फुटीला कारणीभूत ठरला. झालेले शेतीचे व मच्छीमार सोसायटीचे नुकसान जलसंधारण विभागाने भरून द्यावे, तसेच दोषी अधिकाºयावर योग्य ती तातडीने कारवाई करण्यात यावी. अन्यथा पुढचे नियोजन केले जाईल.
- होमराज कापगते, जिल्हा परिषद सदस्य.