अपेक्षित पावसानंतर पऱ्हे पेरणीला आली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:00+5:302021-06-19T04:24:00+5:30
पालांदूर : मृग नक्षत्रात अपेक्षित पावसानंतर पऱ्हे पेरणीला जोर आलेला आहे. कोरडवाहूचा शेतकरीसुद्धा दोन दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर पेरणीकडे ...
पालांदूर : मृग नक्षत्रात अपेक्षित पावसानंतर पऱ्हे पेरणीला जोर आलेला आहे. कोरडवाहूचा शेतकरीसुद्धा दोन दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर पेरणीकडे वळलेला आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे दहा हजार ६०० हेक्टर क्षेत्रांतर्गत खरिपाची लागवड निश्चित केली आहे. चूलबंद खोऱ्यात स्वतंत्र सिंचन योजनेतील शेतकऱ्यांची पेरणी आटोपतीकडे आलेली आहे, तर कोरडवाहू शेतकरी कृषी विभागाच्या सल्ल्याने पेरणीसाठी घाई न करता सलोख्याने घेत आहे.
यांत्रिक युगात पारंपरिक पेरणीयंत्र काळाआड होत असताना काही शेतकरी मात्र अजूनही बैलजोडीच्या आधाराने वखरणीच्या माध्यमातून पऱ्हे पेरणी करीत आहेत. पालांदूर येथील रमेश भुसारी, सुदाम बारई या शेतकऱ्यांनी वखरणीच्या माध्यमातून पऱ्हे पेरणी केलेली आहे. यात दाणा मातीत मिसळला जाऊन उगवणशक्ती बरी येते. एखादा पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता नर्सरीमध्ये तयार होते. बारीक वाणाला अत्यल्प प्रतिसाद असून, संकरित बियाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. अधिक उत्पन्नाच्या लालसेपोटी संकरित बियाणे अधिक लागवड केली जात आहे. बारीक वाणात एचएमटी, श्री १०१, १०८, जय श्रीराम, श्रीराम, केसर आदी वाणाला पसंती मिळत आहे, तर ठोकळ अर्थात बोल्ड जातीत सर्वाधिक १०१०, १००१, सिंधू, बाहुबली संकरित वाणात बायर ६४४४, ८४३३, अंकुर ७५७६ आदी धान बियाणांची लागवड केली जात आहे.
लाखनी तालुक्यात खरीप हंगामात धान सुमारे २३ हजार ७०० हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. यातील पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे १० हजार ६०० हेक्टर पेरणीखाली आहे. पालांदूर येथे ४६७ हेक्टरखाली भात लागवड केली जात आहे. कृषी विभागाच्या सल्ला मसलतीत शेतकरी खरीप हंगाम कसायला व्यस्त दिसत आहे. हिरवळीचे खत, सरी-वरंब्यावर नर्सरी, मध्यम कालावधीचे वाण, ढेंचा, सोनबोरूचा वापर वाढविलेला आहे. १२० ते १४० दिवसांच्या कालावधीचे वाण लागवडीखाली अधिक आहेत. परतीचा मान्सून व किडीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात मध्यम कालावधीचे वाण निवडताना दिसत आहे. उत्पन्न खर्च कमी करण्यासाठी कृषी विभाग तत्परतेने शेतकऱ्यांच्या सेवेत मे महिन्यापासून रुजू आहे. कापणी ते बांधणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन शेतकरी बांधवांना थेट शेतात जाऊन करीत आहेत. खताच्या मात्रेत दहा टक्के बचत करून जमिनीचा पोत सुधारण्याच्या दिशेने शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे.
कोट
यांत्रिक शेतीत खर्च आहे. माझ्याकडे बैलजोडी असून, पारंपारिक शेती अवजारे आहेत. त्यांचा दोन्ही हंगामात योग्यवेळी वापर करून खर्चात बचत करीत आहे. काळानुरूप पारंपरिक अवजारे टिकविणे कठीण आहे. परंतु निसर्गाच्या सान्निध्यात राहून पारंपरिक अवजारांचा वापर निश्चितच सुयोग्य आहे. दोन्ही हंगामात बैलजोडीसह पारंपरिक अवजारांचा वापर करीत आहे.
रमेश भुसारी, बागायतदार शेतकरी, पालांदूर
कोट
नर्सरी घालण्यापूर्वी सरी-वरंबाचा अर्थात गादी वाफ्याचा वापर करावा. बीजप्रक्रिया करूनच बियाणे घालावे. घरचेच बियाणे वापरल्यास उत्पादन खर्चात बचत होते. स्वावलंबन वाढून शेतकरी कमी खर्चाची शेती करण्याकडे वळत आहे. निश्चितच हे प्रेरणादायी आहे.
गणपती पांडेगावकर, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर
कोट
शेतकऱ्यांनी निंबोळ्या जमा करून घरच्या घरीच निंबोळी अर्क तयार करावा. त्यातून योग्यवेळी फवारणीसाठी मोठी मदत शक्य आहे. खताच्या मात्रेत युरिया ब्रिगेडचा वापर करावा. सोबत शिफारसीनुसार पोटॅश खताचा वापर वाढवावा. जेणेकरून खर्चाची बचत होऊन जमिनीचे आरोग्य सुधारणेकरिता मदत होईल.
वैशाली खादांडे, कृषी सहाय्यक, पालांदूर