अग्निकांडानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 07:10 AM2022-01-09T07:10:00+5:302022-01-09T07:10:02+5:30
Bhandara News अकरा चिमुकल्यांचा बळी घेणाऱ्या अग्निकांडानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटले असून अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्रीक दुरुस्ती आणि नवजात शिशूकक्ष उभरण्यासाठी साडेतीन काेटींचा निधी प्राप्त झाला.
ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : अकरा चिमुकल्यांचा बळी घेणाऱ्या अग्निकांडानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटले असून अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्रीक दुरुस्ती आणि नवजात शिशूकक्ष उभरण्यासाठी साडेतीन काेटींचा निधी प्राप्त झाला. लाेकमतने सुरुवातीपासूनच घेतलेल्या आक्रमक भुमिकेने निधी उपलब्ध झाला. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने कामात अडथळा आणल्याने वर्षभरानंतरही नवजात शिशू कक्ष सुरू झाला नाही.
जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षात ९ जानेवारी २०२१ राेजी पहाटे आग लागली. या आगीत दहा बालकांचा हाेरपडून मृत्यू झाला तर एका बालकाचा घटनेनंतर २१ दिवसांनी मृत्यू झाला हाेता. या घटनेनंतर रुग्णालयातील आराेग्य यंत्रणेत कमालीची सुधारणा झाली. लाेकमतनेही याबाबत आक्रमक भुमिका घेत आराेग्य यंत्रणा सुधारण्यासाठी वृत्त प्रकाशित केले. त्यामुळेच जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेसाठी एक कोटी ९२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. रुग्णालयाच्या परिसरात फायर हायड्रन्ट आणि आतील भागात अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली. दुर्देवाने आग लागली तर तापमानाने पाईपमधील पाईंट वितळून पाण्याच्या मारा सुरु हाेईल, अशी यंत्रणा लावण्यात आली आहे. वीज दुरुस्तीसाठी ४० लाख रुपयांचा निधी मिळाला असून या निधीतून सर्व वीज यंत्रणा दुरुस्त करण्यात आली. नवजात शिशू कक्षासाठी आलेल्या एक काेटींच्या निधीतून यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. ३६ इनक्युबेटर दाखल झाले आहे. या कक्षाचे काम आता अंतीम टप्यात असून येत्या महिन्याभरात उपयाेगात येणार आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काम तीन महिने बंद असल्याने विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
आमचे बाळ हिरावले, पुन्हा अशी घटना घडू नये
वर्षभरापूर्वी लागलेल्या आगीत आमचे चिमुकले डाेळ्यादेखत हिरावले. या घटनेतील दाेषींवर कारवाईही हाेईल. मात्र पुन्हा अशी घटना कुठेच घडू नये अशी खबरदारी घ्यावी, असे या अग्निकांडात आपल्या काळजाचा तुकडा हरविलेल्या मातांची शासनाला आर्त हाक आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाला एक वर्ष पूर्ण झाले तरी आजही या अग्निकांडाची धग कायम आहे.
परिचारिकांवर आराेपपत्र दाखल
अग्निकांडाला दाेषी धरुन परिचारिका स्मिता आंबिलढुके आणि शुभांगी साठवणे यांच्याविरुध्द भांदवि कलम ३०४ (पार्ट २) आणि ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. परिचारीका जामिनावर असून दीड महिन्यापूर्वी आराेपपत्र न्यायालयात दाखल झाले. तर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाेद खंडाते यांना निलंबित केले हाेते.