विसर्जनानंतर मिस्कीन टँक तलावाची स्थिती भयावह
By Admin | Published: September 9, 2015 12:26 AM2015-09-09T00:26:16+5:302015-09-09T00:26:16+5:30
जिल्हयात मोठ्या थाटात विविध सण साजरे केले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणोशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते.
निर्माल्यांची विल्हेवाट शून्य : विचारातून व्हावी प्रगल्भतेची जाणीव
भंडारा : जिल्हयात मोठ्या थाटात विविध सण साजरे केले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणोशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. विशेषत: घरात स्थापित करण्यात आलेल्या मूर्र्तींचेही मोठ्या प्रमाणात तलाव, बोळ्या किंवा नदीत विसर्जन केले जाते. दोन दिवसांपूर्वीच शहरातील मिस्कीन टँक तलावात कृष्णमूर्तींच्या विसर्जनानंतर तलावाच्या बिकट स्थितीत अजुनच भर पडली.
धार्मिक सण साजरा करणे हा मुलभूत अधिकारांपैकी एक व तेवढाच मानवी संवेदनाशी जुळला विषय आहे.
‘पीओपी’च्या मूर्ती नको
भंडारा : मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या लाडक्या देवतेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. धर्मशास्त्राच्या नियमानुसार पूजन केलेल्या मूर्तीचे विसर्जन करणे हा धार्मिक पूजा विधीतील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला गेला आहे. अनादी काळापासून मूर्ती विसर्जनाची परंपरा चालत आलेली आहे. आधुनिकतेच्या शिरकावामुळे तयार करण्यात येणाऱ्या भगवंतांच्या मूर्तीमध्येही बदल होत गेले. मातीची जागा काही प्रमाणात ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’ने घेतली. रसायनांचा अतिवापरही वाढला. मानवी जीवनासाठी घातक ठरणारी रसायने मूर्तींना आकर्षक बनविण्यासाठी वापरली जावू लागली. दुसरीकडे लोकसंख्या वाढ, नागरी वस्तीचे वाढते आकारमान आदी कारणांमुळे तलाव व बोळ्यांवरही अतिक्रमण झाले. भंडाऱ्यातील मिस्कीन तलाव अतिक्रमणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
उत्सवादरम्यान घरगुतीसह सार्वजनिक मंडळातील मूर्र्तींचे विसर्जन या तलावात होत आले आहे. आधीच अतिक्रमणामुळे तलावाचे आकारमान कमी होत असताना विसर्जनाच्या प्रक्रियेदरम्यान स्वच्छतेला फाटा देण्याचे कामही भाविकांकडून होत गेले व आजही सुरूच आहे. मूर्तीसह निर्माल्यांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेवरही सर्रास दुर्लक्ष करण्यात येते. सद्यस्थितीत मिस्कीन (टँक) तलावात एका मच्छिमार संस्थेतर्फे शिंगाड्याचे उत्पादन घेतले जात आहे. काल परवा मूर्तीच्या विसर्जनानंतर मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळल्या ; परंतु निर्माल्य तथा लाकडी पाट्यांची विल्हेवाट लावण्यात आली नाही.
ज्या ढिकाणी विसर्जन केले जाते त्या तलावाच्या पाळीवर निर्माल्य गोळा करण्यासाठी नगर पालिका प्रशासनातर्फे दोन ड्रम ठेवण्यात आले. मात्र त्यात कुठल्याही भाविकाने निर्माल्य घालण्याची तसदी घेतली नाही. पॉलिथीनमध्ये आणलेले निर्माल्य तलावात सर्रासपणे फेकण्यातच धन्यता मानण्यात आली. हाच प्रकार सागर तलाव तथा वैनगंगा नदी काठावरही दिसून आला. जनजागृती करूनही जागृतीचा फज्जा झाल्याचा दिसून आला. दुर्गंधी अन् अस्वच्छतेचा कळस मानवी आरोग्याला अपाय ठरतेच, हेही तेढेच सत्य आहे. (प्रतिनिधी)