चौकशी केल्यावर फुटले बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 10:03 PM2018-07-01T22:03:29+5:302018-07-01T22:04:14+5:30

आसाम रायफल्समध्ये नर्सिंग असिस्टंटच्या जागेवर नोकरी लावून देतो असे सांगून कितीतरी युवकांना गंडविणारा सहादेव सोविंदा ढेंगे रा. हरदोली याने या युवकांना बनावट नियुक्तीपत्र देवून आसाम राज्याच्या जोरहाट येथे पाठविले.

After the investigation, | चौकशी केल्यावर फुटले बिंग

चौकशी केल्यावर फुटले बिंग

googlenewsNext
ठळक मुद्देनौकरीच्या नावावर कोट्यवधीने गंडविल्याचे प्रकरण

सिराज शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : आसाम रायफल्समध्ये नर्सिंग असिस्टंटच्या जागेवर नोकरी लावून देतो असे सांगून कितीतरी युवकांना गंडविणारा सहादेव सोविंदा ढेंगे रा. हरदोली याने या युवकांना बनावट नियुक्तीपत्र देवून आसाम राज्याच्या जोरहाट येथे पाठविले. मात्र त्यांची नियुक्ती झाली नाही व खोटे कारणे दाखवून त्यांना परत पाठविले. भंडारा येथे आल्यावर काही युवकांनी कामठी येथील मिलिट्री इंटिलेजंस बोर्डकडे जाऊन चौकशी केली असता देण्यात आलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले.
सहादेव सोविंदा ढेंगे हा सेवानिवृत्त जवान असून त्याची काही लोकांसोबत ओळख झाली. त्यातुनच बेरोजगार युवकांना लुबाडण्याचे कारस्थान शिजविण्यात आले. आसाम राज्यातील जोरहाट या शहरात राहणाऱ्या एका महिलेने स्वत:ला सेनेच्या कर्नल आहोत असे भासवून संपूर्ण देशभरात आपले एजंट नेमले. आसाम रायफल्समध्ये नर्सिंग असिस्टंटच्या ५७४ जागा निघालेल्या असून त्या ठिकाणी मी युवकांना नौकरी लावून देऊ शकतो, अशी बतावनी केल्याने अनेक जण तिच्या बोलण्यात फसले. हरदोली झंझाड येथील सहादेव ढेंगे व भंडारा, धुळे, नागपूर, गोंदिया येथील काही व्यक्ती तिच्यासाठी काम करण्यास तयार झाले. निवृत्त जवान सहादेव ढेंगे याने मोहाडी व तुमसर तालुक्यातील बेरोजगार युवकांना घेवून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचलक्ष २० हजार रूपये घेतले. आतापर्यंत २७ युवक समोर आलेले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या युवकांकडून पैसे घेतल्यानंतर १० आॅक्टोंबर २०१५ रोजी दोन व्यक्तींनी येथील काही युवकांना रेल्वेद्वारे शारीरिक तपासणी करण्यात आली.
मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र तेथील बनावट कर्नल असलेल्या महिलेने आपल्या जवळ ठेवून घेतले. त्यानंतर आसाम राज्यातील जोरहाट येथे या युवकांना नेवून रॉयल इन्स्टीट्यूट जोरहाट येथे २८ आॅक्टोबर पासून सर्व युवकांना नर्सिंग असिस्टंटचे तीन महिन्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले. प्रशिक्षणानंतर एक महिन्यात नियुक्ती होईल, असे सांगून सर्व युवकांना परत गावी पाठविले. मात्र वर्ष लोटूनही नौकरी मिळत नसल्याने या युवकांनी सहादेव ढेंगे यांच्याशी संपर्क केला पण तो वेगवेगळे कारण सांगून वेळ मारून नेत होता. या युवकांचा वारंवार तगादा वाढल्याने निवृत्त जवाण सहादेव ढेंगे याने ३ मार्च २०१८ रोजी आसाम रायफल्समध्ये नियुक्ती झाल्याचे पत्र आणून दिले. हे पत्र घेवून जेव्हा सर्व युवक जोरहाट येथे गेले तेव्हा तेथे धुळे येथील एका व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणी फिरविले. तांत्रिक अडचणी येत आहेत अजुन १५ दिवस थांबा असे सांगण्यात आल्याने धुळे येथून नौकरीसाठी आलेल्या युवकांनी मिल्ट्री ट्रेनिंग कॅम्पमध्ये जावून चौकशी केली असता हे नियुक्ती पत्र आम्ही दिलेले नाही असे उत्तर मिळाले. कामठी येथील मिल्ट्री इंटिजेलंस विभागात जावून चौकशी केली. तीन चार दिवसांनी त्यांनी चौकशी केल्यावर नियुक्ती पत्र बनावट असल्याचे सांगितल्याने या युवकांनी पोलिसात तक्रार केली.
मोठ्या रॅकेटची शक्यता
या प्रकरणात अन्य सात आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींना अटक करण्यासाठी मोहाडी पोलिसांनी दोन चमू तयार केल्या आहेत. या प्रकरणात फक्त मोहाडी व तुमसरच्याच युवकांना गंडा घालण्यात आला नसून इतर राज्य व जिल्ह्यातील सुद्धा युवकांना मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आल्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, जळगाव, धुळे, उत्तरप्रदेश येथील युवकांना प्रशिक्षण दिल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मोठा रॅकेट असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.
मूळ प्रमाणपत्र भामट्यांच्या ताब्यात
तक्रारकर्ते २७ युवकांचे मुळ प्रमाणपत्र टीसी, गुणपत्रक, जात प्रमाणपत्र इत्यादी या भामट्यांच्या ताब्यात असल्याने या युवकांना दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज सुद्धा करता येत नाही. ते प्रमाणपत्र मिळवून द्यावे, अशी मागणी या युवकांनी केली आहे.

Web Title: After the investigation,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.