प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:59+5:302021-08-18T04:41:59+5:30

तरीही धान शेती तहानलेलेच : नियमित वीजपुरवठा करण्याची बळीराजाची मागणी .संतोष जाधवर भंडारा : निम्मा पावसाळा संपत आला तरीही ...

After a long rest, the arrival of rain soothed Baliraja in the district | प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील बळीराजा सुखावला

प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील बळीराजा सुखावला

Next

तरीही धान शेती तहानलेलेच : नियमित वीजपुरवठा करण्याची बळीराजाची मागणी .संतोष जाधवर

भंडारा : निम्मा पावसाळा संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. साेमवारी दुपारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरीही अजूनही धान शेतीला जोरदार पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील ९० धान रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र रोवणी नंतर आता पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिल्याने धान शेती सुकत असलेली दिसून येते. अनेक ठिकाणी शेतशिवारात जमिनीला भेगा पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे विहीर, बोअरवेलमध्ये मुबलक पाणी आहे. मात्र वीजपुरवठा होत नसल्याने सिंचन करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. गतवर्षी आलेला महापूर, तुडतुडा रोगाने हल्ला चढवल्याने धानाचे उत्पादन हाती आले नव्हते. त्यामुळे या खरीप हंगामात तरी चांगले उत्पादन होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पीक कर्ज काढून धान रोवणी केली आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

कोट

माझ्याकडे विहीर, बोअरवेलची सोय आहे. मात्र लाईट उपलब्ध होत नसल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात २४ तास वीज उपलब्ध राहते. शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.

तानाजी गायधने,

कृषिभूषण पुरस्कारप्राप्त, शेतकरी चिखली.

कोट

माझ्याकडे दोन बोअरवेल आहेत. पण लाईट राहत नसल्याने काहीच उपयोग होत नाही. अजूनही माझी एक एकर रोवणी रखडली आहे. बळीराजावर संकट कायम असल्याने शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करुन शासकीय मदत द्यावी.

संजय आकरे, खरबी नाका

कोट

मंगळवारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरीही सध्या धान पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. अनेक शेतकऱ्यांकडे शाश्वत सिंचनाची सोय आहे. मात्र विजेअभावी शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही. निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेत कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सिंचन योजना तसेच आधुनिक पीक पद्धतीचे फायदे सांगून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

बॉक्स

भगवंता आमची अशी परीक्षा बघू नको ...

जिल्ह्यातील बळीराजा देवाला पावसासाठी साकडे घालत आहेत. काहीही होऊ दे पण पाऊस पडू दे, बळीराजाची अशी सत्व परीक्षा भगवंता पाहू नको. आमच्यावरच दुष्काळाचे संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडून चांगले उत्पन्न होऊ दे अशी प्रार्थना अनेक ठिकाणी मंदिरातून केली जात आहे.

बॉक्स

तालुकानिहाय राेवणी

तालुका क्षेत्र प्रत्यक्ष टक्केवारी

भंडारा १००

मोहाडी ७०

तुमसर ९४

पवनी १३७

साकोली ८३

लाखांदूर ९६

लाखनी ८७

एकूण ९४

Web Title: After a long rest, the arrival of rain soothed Baliraja in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.