पावसाच्या हजेरीनंतरही आठ टक्केच जलसाठा
By admin | Published: July 12, 2016 01:49 AM2016-07-12T01:49:26+5:302016-07-12T01:49:26+5:30
गत तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. जिल्ह्यातील लघु, मध्यम व
बेटेकर बोथलीसह १२ प्रकल्प कोरडेच : वैनगंगा नदीपात्रात मुबलक जलसाठा, पावसाचे पाणी जतन करण्याची गरज
देवानंद नंदेश्वर ल्ल भंडारा
गत तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ आठ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठ्यात किंचीत घट झालेली आहे.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत बेटेकर बोथली प्रकल्प वगळता चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ४.९२१, बघेडा १४़७६४, सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा ७.०७९ टक्के आहे़
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ११़७५ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ६.६५ टक्के आहे़
जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे.
विदर्भातील महत्वाकांक्षी गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़
भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १०़४७५ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी ११ जुलै २०१५ रोजी ६३ प्रकल्पात १०़४३५ आणि ११ जुलै २०१४ रोजी २३.१९९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ तीन दिवसांत जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरी आजही जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे.
१२ प्रकल्पात
पाण्याचा ठणठणाट
पावसाळा ऋतूला दोन महिने लोटले असले तरी आजही जिल्ह्यातील ११ प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. कोरडे असलेल्या प्रकल्पांमध्ये बेटेकर बोथली, पवनारखारी, हिवरा, डोडमाझरी, मालीपार, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, खंडाळा, चान्ना, डोंगरगाव, एलकाझरी, जांभोरा यांचा समावेश आहे.
केवळ ३५८ हेक्टरमध्ये झाली रोवणी
४भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात भात लागवडीसाठी १ लाख ८२ हजार ७६२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारीत करण्यात आले आहे. मात्र मृग, आद्रा नक्षत्रात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आजपर्यत सिंचनाच्या सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी ३५८ हेक्टर क्षेत्रातील रोवणी आटोपली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ११ जुलैपर्यत १० हजार ८२६ हेक्टरमध्ये भात नर्सरी (पऱ्हे), ३ हजार ४५४ हेक्टरमध्ये आवत्यांची लागवड करण्यात आली आहे. तुर पिकाचे ४ हजार ३४९ हेक्टर, तीळ ४८ हेक्टर, सोयाबीन २५८ हेक्टर, हळद २०० हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे.