वडिलांचा मृतदेह घरात.. त्याने धैर्याने सोडविला दहावीचा पेपर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:39 PM2023-03-15T15:39:53+5:302023-03-15T15:45:03+5:30

दहावीचा पेपर सोडवून आल्यावर मुलाने दिला वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी

After solving the 10th class paper, the son cremated his father's body on fire | वडिलांचा मृतदेह घरात.. त्याने धैर्याने सोडविला दहावीचा पेपर

वडिलांचा मृतदेह घरात.. त्याने धैर्याने सोडविला दहावीचा पेपर

googlenewsNext

दयाल भोवते

लाखांदूर (भंडारा) : दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू असतानाच ‘त्याच्या’ वडिलांचा अचानक मृत्यू झाला. नेमका त्या दिवशी भूमितीचा पेपर होता. एकीकडे वडिलांच्या जाण्याचे अपार दु:ख, अन् दुसरीकडे बोर्डाची परीक्षा! डोळ्यात आसवांचा पूर घेऊन खिन्नपणे बसलेल्या मुलाला कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी हिंमत दिली. घडले ते आपल्या हातात नाही, परीक्षा दे, ही संधी सोडू नको, असे समजावले. अखेर घरी वडिलांचा मृतदेह ठेवून तो परीक्षा केंद्रावर गेला. पेपर सोडवून आल्यावर प्रेताला अग्नी दिला.

लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे बुधवारी १५ मार्चला ही घटना घडली. येथील भाष्कर पांडुरंग तुपटे (४२) यांची मागील चार-पाच दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडली. कुटुंबियांनी डॉक्टरांच्या मदतीने उपचारही केले. मात्र बुधवारी अचानकपणे सकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा १६ वर्षिय मुलगा ओमकार शिवाजी विद्यालयात शिकतो. त्याचा सकाळी ११ वाजता दहावीच्या भूमितीचा (गणित -२) पेपर होता. एकीकडे पितृवियोग, अन् दुसरीकडे परीक्षा. अखेर दु:ख बाजुला सारून त्याने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. गावापासून १२ किलोमीटर अंतरावरील लाखांदूरच्या शिवाजी विद्यालयातील परीक्षा केंद्र गाठले. डोळ्यातील आसवांना बांध घालून पेपर सोडविला.

पेपर सुटल्यावर केले अंत्यसंस्कार

दुपारी १.१० वाजता पेपर सुटताच ओमकार गावात परतला. तोपर्यंत अंत्यसंस्काराची तयारी झाली होती. घरी परतल्यावर कुटुंबीय, नातलग व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत वडिलांच्या चितेला भडाग्नी देऊन मुलाचे कर्तव्य पार पाडले.

Web Title: After solving the 10th class paper, the son cremated his father's body on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.