भंडारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेनंतर नाराजी नाट्य सुरू; तडजाेडीच्या राजकारणात निष्ठावंत बाजूला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 03:11 PM2022-05-13T15:11:23+5:302022-05-13T15:19:05+5:30
जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीत नाराजी नाट्य तर भाजपमध्ये उभी फूट हा विषय चांगलाच गाजत आहे. आता याचे पडसाद जिल्हा परिषदेत कायम उमटणार आहेत.
भंडारा : दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेत एकदाची सत्ता स्थापन झाली. तडजाेडीच्या राजकारणात निष्ठावंतांना बाजूला सारले. नेत्यांनी दिलेला शब्द ऐनवेळी बदलविला. आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेनंतर नाराजी नाट्य सुरू झाले आहे. तर, दुसरीकडे सभागृहात सत्ता स्थापन करताना झालेला वाद पाेलीस ठाण्यात पाेहाेचला.
भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक १० मे राेजी पार पडली. काँग्रेसने भाजपचा एक गट फाेडून अध्यक्षपद मिळविले. मात्र, आता काँग्रेसमध्येच नाराजी नाट्य सुरू झाले आहे. सुरुवातीपासून अध्यक्षपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माेहन पंचभाई यांचे नाव आघाडीवर हाेते. मात्र, ऐनवेळी तडजाेडीच्या राजकारणात काेंढा गटाचे सदस्य सेवानिवृत्त शिक्षक गंगाधर जीभकाटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. त्यामुळे पंचभाई नाराज झाले. परंतु, त्यांनी आपली नाराजी अद्यापही उघड केली नाही. परंतु, त्यांच्या मनात अध्यक्षपद न मिळाल्याचे शल्य आहे. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड झाल्यावर पवनी येथे काही कार्यकर्त्यांनी निषेध फलकही झळकविले हाेते. आता काँग्रेस जिल्हाध्यक्षांची ही नाराजी काेणत्या स्तरापर्यंत जाणार. नेते त्यांची कशी समजूत काढणार, असा प्रश्न आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीतही नाराजीचा सूर आहे. उपाध्यक्षपदी नामांकन दाखल करताना याचे पडसाद दिसून आले. राष्ट्रवादीने अविनाश ब्राह्मणकर यांना उपाध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करायला लावले. या पदासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत साेनकुसरेही इच्छुक हाेते. परंतु ऐनवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याने त्यांच्याऐवजी ब्राह्मणकर यांना संधी दिली. याचे पडसादही राष्ट्रवादीत उमटत आहेत. आता आगामी काळात या नाराजी नाट्याचे काय पडसाद पडतात हे पाहणे महत्वाचे आहे.
सभागृहात रणकंदन
जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामाेडींचे पडसाद कायम सभागृहात दिसणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचा मूळ गट आक्रमक राहणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक बैठकीत रणकंदन दिसून येईल. या सर्व प्रकरणात विकासाचा मुद्दा मात्र हरविला जाण्याची शक्यता आहे.
सभागृहातील वाद पोलीस ठाण्यात
सत्ता स्थापनेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत नाराजी असताना सत्ता स्थापनेच्यावेळी झालेल्या हाणामारीचे प्रकरण थेट पाेलीस ठाण्यात पाेहाेचले. भाजपच्या महिला सदस्याने दिलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे नवनियुक्त संदीप ताले यांच्यासह तीन सदस्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. तर, संदीप ताले यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाजपच्या तिघांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. भाजपमध्ये उभी फूट पडली असून यातील वाद आता पाेलिसांपर्यंत गेला आहे. एकंदरीत जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीत नाराजी नाट्य तर भाजपमध्ये उभी फूट हा विषय चांगलाच गाजत आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेत कायम उमटणार आहेत.