तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वल पळाले जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:58+5:302021-05-24T04:33:58+5:30

वन विभागाची यशस्वी कारवाई, पवनी तालुक्यातील अड्याळ येथील घटना भंडारा : गाव हद्दीत शिरलेल्या एका मादी अस्वलाला जंगलाच्या दिशेने ...

After a three-hour effort, the bear fled into the woods | तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वल पळाले जंगलात

तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वल पळाले जंगलात

googlenewsNext

वन विभागाची यशस्वी कारवाई, पवनी तालुक्यातील अड्याळ येथील घटना

भंडारा : गाव हद्दीत शिरलेल्या एका मादी अस्वलाला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात वन विभागाला यश आले आहे. तीन तासांपर्यंत चाललेली ही कारवाई रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पवनी तालुक्यातील अड्याळ येथील किटाडी फाटा शिवारालगत करण्यात आली. यावेळी घटनास्थळी उपवनसंरक्षकांसह वनविभागाचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्र अंतर्गत येथील किटाडी फाटा येथील गावालगतच्या झुडुपात अस्वल असल्याची माहिती वनविभागाला रविवारी सकाळी मिळाली. या मादी अस्वलाला आरआरयू पथक व अड्याळ येथील वन कर्मचाऱ्यांसह जेसीबी व फटाक्‍यांचा वापर करून गाव शिवारात शिरू न देण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच त्या अस्वलाला जंगलाकडे जाण्यास प्रवृत्त करण्याकरिता उपाययोजना केली. गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला लांब अंतराहून हिरवी नेट लावण्यात आली होती. तसेच सुरक्षित अंतरावरून अस्वलाला जंगलाच्या दिशेने पळून जाण्याकरिता हालचाल करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ व वाहनांमुळे तिला अडथळा होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था अंतर्गत केमिकल रेस्क्यूची पण तयारी करण्यात आली होती. परंतु त्याची आवश्यकता भासली नाही. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अस्वल फटाक्यांच्या आवाजाने झुडपातून बाहेर निघाले. परंतु नागरिकांचा जमाव व आवाजाने ती परत झुडपात शिरले. वन विभागाच्या पथकाने प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी अस्वलाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यात वन विभागाला यश आले.

या कारवाईदरम्यान उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, सहायक वनसंरक्षक वाय. बी. नागुलवार, भंडाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, अड्याळ वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, आरआरयू पथकाचे अनिल शेळके, नीलेश श्रीरामे, धनिराम पातोडे, अड्याळ वनविभागाचे विनोद पंचभाई यासह अन्य कर्मचारी व वनरक्षक उपस्थित होते.

Web Title: After a three-hour effort, the bear fled into the woods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.