जिल्ह्यात ४८३ मतदारांचे वय वर्षे १००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:22+5:302021-02-06T05:06:22+5:30
भंडारा : लोकशाहीसाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी राज्य निवडणूक आयोग मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवून ...
भंडारा : लोकशाहीसाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी राज्य निवडणूक आयोग मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवून नावनोंदणी करण्याचे आवाहन करीत असते. जिल्ह्यात आतापर्यंत वयवर्षे १०० ओलांडणाऱ्या मतदारांचा आकडा ४८३ एवढा आहे.
दिवसेंदिवस मतदानाच्या टक्केवारीत घट होत आहे. मतदान प्रक्रियेत मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे या जनजागृती मोहिमेंतर्गत जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवून मतदानावर भर देण्यात आला. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण मतदार १० लाख १३ हजार ३४१ आहे. यात महिला ५ लाख ३ हजार ८२२ तर पुरुष ५ लाख ९ हजार ५०७ व तृतीयपंथी १२ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये १८ ते १९ वयोगटांत १७ हजार १०३ तसेच ९० ते ९९ वयोगटांत ३ हजार १६७ मतदार आहेत. मतदान नोंदणीसाठी युवकांचा पुढाकार दिसून येत असला तरी वयोवृद्ध नागरिकांच्या मयतीनंतरही नाव वगळण्यात येत नसल्याचेही दिसून येते. जिल्ह्यात अनेक ठिकाणचे मतदार परगावी असतानाही त्यांची नावे यादीत मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
जिल्ह्यात ३ हजार ४७७ नवमतदार
जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटांत एकूण १७ हजार १०३ मतदारांची नोंदणी आहे. मतदारयादीत नावाची नोंदणी व्हावी, यासाठी तरुणतरुणी मोठ्या प्रमाणात पुढे येत असून अलीकडे ३ हजार ४७७ नवमतदारांनी नावाची नोंदणी केली आहे.