शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले
By admin | Published: August 19, 2016 12:33 AM2016-08-19T00:33:23+5:302016-08-19T00:33:23+5:30
तीन दिवसांपासून वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे भारनियमनाविरुद्ध धरणे आंदोलन सुरु होते
सकाळी लोटांगण आंदोलन : प्रकरण भारनियमनाचे
साकोली : तीन दिवसांपासून वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे भारनियमनाविरुद्ध धरणे आंदोलन सुरु होते. मात्र अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यामुळे या आंदोलनाचे रुपांतर आता आमरण उपोषणात झाले आहे.
साकोली तालुक्यातील १६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयासमोर दि. १६ पासून बेमुदत भारनियमन सुरु केले. मात्र या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी सकाळी लोटांगण आंदोलन व नंतर गावात मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देऊन धरणे आंदोलनाचे रुपांतर आता आमरण उपोषणात केले आहे. काही काळ तणावाचे वातावरण चिघळले होते.
यावेळी अविनाश ब्राम्हणकर, अंताराम खोटेले, राम महाजन, हरिभाऊ खोटेले, रामचंद्र कापगते, दुर्वास कापगते, सुरेशसिंह बघेल, गोवर्धन कापगते, नंदू समरीत, रामदास कापगते, बाबूराव कापगते, प्रकाश शिवणकर, अभिमन चुटे व मारोती कापगते उपस्थित होते.
मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या धरणे आंदोलनातून काहीच तोडगा निघाला नाही. म्हणून आज सकाळी शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन केले व अधिकाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी आमच्या अंगावरून जा अशी भूमिका घेतली होती. मात्र वीज कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना न जुमानता मिळेल त्या ठिकाणाहून जाऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी काही काळ वातावरण चिघळले होते. नंतर वातावरण शांत झाले. (तालुका प्रतिनिधी)