भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे आगळीवेगळी गोधनाची पूजा; गुराख्याच्या अंगावरून धावला गायींचा कळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 09:44 PM2022-10-25T21:44:09+5:302022-10-25T21:44:50+5:30
Bhandara News मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे बलिप्रतिपदेच्या दिवशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने गोधनाची पूजा केली जाते. दीडशे गायींचा कळप अंगावरून जाऊनही गुराख्याला साधे खरचटले नसल्याचा चित्तवेधक अनुभव पंचक्रोशीतील नागरिकांनी अनुभवला.
युवराज गोमासे
भंडारा : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे बलिप्रतिपदेच्या दिवशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने गोधनाची पूजा केली जाते. दीडशे वर्षांपासून यंदाही दीडशे गायींचा कळप अंगावरून जाऊनही गुराख्याला साधे खरचटले नसल्याचा चित्तवेधक अनुभव पंचक्रोशीतील नागरिकांनी अनुभवला. ही परंपरा गावातील परतेकी कुटुंबीयांकडून जोपासली जात आहे.
बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्वत्र गोधनाची पूजा केली जाते. गायीला अंघोळ घालून जनावरांची गावात मिरवणूक काढून अंगणातील शेणाचे गोधन गायीच्या पावलाने उधळले जाते; परंतु जमिनीवर पालथे झोपून आपल्या अंगावरून संपूर्ण कळप चालवून घेण्याची अनोखी परंपरा जांभोरा येथे ३०० वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजतापर्यंत या चित्तथरारक गोधन पूजेत जांभोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेकी (३५) यांच्या अंगावरून शेकडो गायीचा कळप धावत गेला. मात्र, ते सुखरूप होते.
जांभोरा हे प्रगतिशील शेतकऱ्यांचे गाव आहे. शेतीला जोडधंदा म्हणून गोपालन केले जाते. गावात १०० टक्के शेतकरी असून दीडशे ते दोनेशे गायी आहेत. गावातील सर्व गायी चारायला जंगलात नेण्याचे काम पिढ्यानपिढ्या परतेकी कुटुंबाकडे आहे. तीनशे वर्षांपूर्वी परतेकी कुटुंबाने ही प्रथा सुरू केली. ती आजही कायम आहे.
क्षणात गोधन जाते अंगावरून
गोधन पूजानिमित्त गायींना अंघोळ घातली जाते. शिंगे रंगवून व नवीन गेटे, दावे बांधून सजविले जाते. तांदळाची खीर गायींना खाऊ घातल्यानंतर मिरवणूक काढली जाते. मुख्य चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो. काही क्षणातच संपूर्ण गोधन त्याच्या अंगावरून जाते.
डफळी व मुरलीच्या निनादात दादऱ्याची मैफल
गोवारी समाजासाठी दिवाळी पर्वणी असते. सकाळी जनावरांना लक्ष्मीसारखे सजवले गेले. सायंकाळी सर्व गायी-गुरे गावामधून फिरवून फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक गाय हंबरेपर्यंत नाचविण्यात आल्या. तत्पूर्वी, दोन बांबूवर पुरुष-ढाल म्हणजे गोहळा व स्त्री-ढाल म्हणजे गोहळी उभारण्यात आली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास गोवारी नृत्याला प्रारंभ झाला. डफळी व मुरलीच्या निनादात दादऱ्याची मैफल रंगल्याने नृत्यात रंगत आली.
गोमातेनेच आम्हाला पोटापाण्याचे व जगण्याचे साधन दिले. आजोबा-पणजोबापासून ही प्रथा सुरू आहे. वर्षभर गायी चारताना कधी कधी काठीने मारतो. या माध्यमातून आम्ही क्षमा मागतो.
-विनायक परतेती, गुराखी, जांभोरा.