जिल्ह्यात कृषी पर्यटनाचे नवे दालन उघडणार, मथाडी शिवारात कामे अंतिम टप्प्यात
By युवराज गोमास | Published: April 14, 2024 04:44 PM2024-04-14T16:44:07+5:302024-04-14T16:44:55+5:30
भंडारा कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत गणेश शेंडे यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत कृषी क्षेत्रात झालेले बदल अनुभवले. कृषीतून निर्माण झालेला पर्यटनीय विकास पाहिला. तीच संकल्पना भंडारा जिल्ह्यातही राबवावी, या हेतूने मागील पाच वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
भंडारा : पर्यटन व्यवसाय सर्वत्र झपाट्याने वाढत आहे; परंतु जिल्ह्यात कृषी क्षेत्रात अद्यापही कुठेही पर्यटनीय दृष्टीने कामे झालेली नाहीत. कृषी पर्यटनात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने झपाटलेल्या एका तरुणाने ५ वर्षांपासून त्याच्या २५ एकरांतील खासगी शेतात 'पाटीलवाडी कृषी पर्यटन' या नावाचे नवे दालन सुरू करण्याचा खटाटोप चालविला आहे. त्या तरुणाचे नाव गणेश शेंडे, रा. भंडारा, असे आहे.
भंडारा कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत गणेश शेंडे यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत कृषी क्षेत्रात झालेले बदल अनुभवले. कृषीतून निर्माण झालेला पर्यटनीय विकास पाहिला. तीच संकल्पना भंडारा जिल्ह्यातही राबवावी, या हेतूने मागील पाच वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी पर्यटन विकासासाठी त्यांनी भंडारा शहरापासून अवघ्या आठ किमी, तर भंडारा ते अड्याळ मार्गावरील पालगाव फाटावरून ३ अंतरावरील मथाडी (पालगाव) शेतशिवाराची निवड केली. खडतर प्रयत्नातून त्यांनी कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल केला.
निव्वळ शेतीवर अवलंबूून न राहता परिसरातील मजुरांनाही रोजगार देता यावा, या उद्देशाने त्यांनी २५ एकर शेतापैकी ५ एकर शेतीवर कृषी पर्यटनाचा विकास केला. हिरवेगार प्रशस्त लॉन, कार्यक्रमांसाठी बैठक सुविधा, मुलांसाठी खेळणे, उडणारे कारंजे, भाेजन सुविधांची उभारणी केली. नौकाविहार, फळ व फुलझाडे, फुलशेती, मत्स्यपालन, बदक व कुक्कुटपालन आदी रोजगाराभिमुख उपक्रमही सुरू केले. नाला काठावरील शेतीचा विकास करीत हिरवेगार रान फुलविले. शेतात पाऊल ठेवताच प्रसन्नतेचा व निसर्ग सान्निध्याची अनुभूती मिळते. कृषी पर्यटकांच्या आवडीनुसार भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे.
पीक पद्धतीत केले नवनवे प्रयोग -
जिल्ह्यात धान शेतीला विशेष महत्त्व आहे; परंतु या शेतीव्यतिरिक्त अन्य पिकांतून मिळणारे उत्पन्न मोठे असते. त्यासाठी त्यांनी नवनवे प्रयोग केले. ठिबक सिंचन व मल्चिंगवर २० एकरांत विविध प्रकारची शेती फुलविली आहे. ३ एकरांत पपई, २ एकरांत केळी, २ एकरांत काकडी, २ एकरांत चवळी, २ एकरात टरबूज, दीड एकरात खरबूज, तर ३ एकरांत मत्स्यपालन व मत्स्यबीजनिर्मितीला प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे चांगले उत्पन्नही हाती पडत आहे.
३० मजुरांना मिळतोय बारमाही रोजगार -
विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, या जाणीवजागृतीसाठी गणेश शेंडे यांनी स्वत: सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सेंद्रिय शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सर्वाधिक हिस्सा रोजगारनिर्मितीवर खर्च होत आहे. सध्या परिसरातील ३० महिला व पुरुषांना त्यांच्या कृषी क्षेत्रातून रोजगार दिला जात आहे.