कृषिपंपांची शेतकऱ्यांकडे ४९ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:46 AM2019-04-18T00:46:31+5:302019-04-18T00:48:55+5:30
साकोली उपविभागातील १८ हजार ५८१ कृषीपंपधारकांकडे तब्बल ४८ कोटी ९९ लाख ७२ हजार ३३७ रुपये थकबाकी आहे. गत तीन वर्षांपासून या थकबाकीवर शासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. उलट या थकबाकीवर व्याज मात्र वाढत चालले आहे.
शिवशंकर बावनकुळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : साकोली उपविभागातील १८ हजार ५८१ कृषीपंपधारकांकडे तब्बल ४८ कोटी ९९ लाख ७२ हजार ३३७ रुपये थकबाकी आहे. गत तीन वर्षांपासून या थकबाकीवर शासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. उलट या थकबाकीवर व्याज मात्र वाढत चालले आहे.
साकोली उपविभागात लाखनी, लाखांदूर आणि साकोली या तीन तालुक्यांचा समावेश होतो. साकोली तालुक्यात सहा हजार २३२ कृषीपंप धारक आहेत. त्यांच्याकडे १६ कोटी १९ लाख २१ हजार २९८ रुपये थकबाकी आहे. लाखनी तालुक्यात सहा हजार २६६ कृषीपंप धारक असून त्यांच्याकडे १५ कोटी ९० लाख ७९ हजार ४२५ रुपये थकबाकी आहे तर लाखांदूर तालुक्यात ६ हजार ८३ कृषीपंपधारक असून त्यांच्याकडे १६ कोटी ८९ लाख ७० हजार ९१४ रुपये थकबाकी आहे. या तीन्ही तालुक्यातील थकबाकी सुमारे ४९ कोटींची आहे.
निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी आणि वीज वितरण कंपनीने केलेल्या भरमसाठ दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनदरबारी शेतकºयांची वीज जोडणी कापायची नाही असे धोरण आहे. त्यातच कृषीपंप धारकांना शासन विजेचे बिल माफ करेल या आशेवर अनेक शेतकºयांनी बिलच भरले नाही. ही थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. एका उपविभागाची एवढी थकबाकी आहे तर जिल्ह्याची ५०० कोटीच्या वर असण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत धान उत्पादक शेतकरी सर्वच स्तरात दुर्लक्षित ठरत आहे. उत्पादनाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नाही. शेतकºयांची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशा स्थितीत कृषिपंपाची थकबाकी वाढत आहे. याबाबत शासनाने उपाययोजना करावी आणि शेतकºयांचे बिल माफ करावे अशी मागणी आहे.
कृषीपंपधारक विजेचे बिल भरत नाही. त्यामुळे थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. कृषीपंपधारक शेतकरी बिल का भरत नाही हे मात्र निश्चित सांगता येणार नाही.
-अनिल गेडाम, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, साकोली.