आगीत 12 लाखांचे कृषी साहित्य भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 11:35 PM2022-11-18T23:35:53+5:302022-11-18T23:36:35+5:30
दिघोरी येथील मुखरू कापसे यांच्या गावाच्या मध्यवस्तीत शिवश्रद्धा कृषी केंद्र आहे. गुरुवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद केले आणि घरी गेले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला कृषी केंद्रातून धूर निघत असल्याचे दिसले. ट्रकचालक गावातीलच असल्याने त्याने कृषी केंद्राचे मालक मखरू कापसे यांना फोन करून कृषी केंद्रातून धूर निघत असल्याची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : कृषी केंद्राला लागलेल्या आगीत १२ लाख रुपयांचे साहित्य भस्मसात झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील दिघोरीमोठी येथे शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली उघडकीस आली. आगीत कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक, रब्बी हंगामाचे धान बियाणे जळून खाक झाले. एका ट्रकचालकाला कृषी केंद्रातून पहाटे धूर निघत असल्याचे दिसल्याने आगीचा हा प्रकार पुढे आला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
दिघोरी येथील मुखरू कापसे यांच्या गावाच्या मध्यवस्तीत शिवश्रद्धा कृषी केंद्र आहे. गुरुवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद केले आणि घरी गेले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला कृषी केंद्रातून धूर निघत असल्याचे दिसले. ट्रकचालक गावातीलच असल्याने त्याने कृषी केंद्राचे मालक मखरू कापसे यांना फोन करून कृषी केंद्रातून धूर निघत असल्याची माहिती दिली. ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. बंद दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसून आले. तोपर्यंत गावकरीही गोळा झाले. कृषी केंद्राचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला, तर ते गरम झालेले होते. परिस्थितीत नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने शटर उघडले. कृषी केंद्रातील औषधी, बी-बियाणे व कीटकनाशके जळत असल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी पाण्याचा मारा करून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य भस्मसात झाले होते. काउंटरवर असलेले संगणक, रोख रक्कम, आदी साहित्य जळून खाक झाले.
या घटनेची माहिती मखरू कापसे यांनी दिघोरी पोलिस ठाण्यासह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच तलाठी संजय मेश्राम यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून प्राथमिक अंदाजानुसार १२ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
- कापसे यांच्या शिवश्रद्धा कृषी केंद्राला शॉर्टसर्किटमुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असून तपास दिघोरीचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.