देयक न पाठविता बंद केले कृषीपंप
By Admin | Published: August 18, 2016 12:20 AM2016-08-18T00:20:02+5:302016-08-18T00:20:02+5:30
कृषीपंपाचे देयक न पाठविता वीज जोडणी खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे.
वीज मंडळाची अरेरावी : शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
भंडारा : कृषीपंपाचे देयक न पाठविता वीज जोडणी खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कनिष्ठ अभियंता व लाईनमेनच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून न्याय कुणाला मागायचा असा सवाल त्यांनी केला आहे.
याबाबत असे की, धारगाव फिडर अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा येथील अनेक शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा लाईनमेननी खंडीत केला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. अनेकदा या विषयी अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या अरेरावीला सामोरे जावे लागले. अखेर २० दिवसानंतर वीज पुरवठा सुरु करण्यात आला. मात्र वरिष्ठांकडे तक्रार का केली म्हणून रुखमा लांजेवार या महिला शेतकऱ्याचा वीज पुरवठा पुन्हा खंडीत करण्यात आला. सदर शेतकऱ्याच्या कृषी पंपाची दीड महिन्यापूर्वी वीज जोडणी करण्यात आली. केवळ दीड महिना लोटला असताना त्याचे देयक सुद्धा पाठविण्यात आले नाही. देयक पाठविले नसताना देयक भरण्याचे अधिकारी सांगत आहेत.
परिसरातील शेतकऱ्यांचे वीज जोडणी खंडीत न करता हेतुपुरस्सर एका महिला शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. लाईनमेन जांगडे व त्याचा सहकारी सोनकुसरे यांनी हा प्रकार हेतुपुरस्सर केल्याचा आरोप आहे.
बेजवाबदार कर्मचाऱ्यावर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी महिला शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान मंगळवार रोजी जवळपास १० शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली.
वरिष्ठांच्या आदेशानंतर वीज पुरवठा सुरु करण्यात आला. मात्र वरिष्ठांकडे तक्रार केली म्हणून लांजेवार यांचा वीज प्रवाह खांबावरून बंद करण्यात आला. लाईनमेन व त्याचे सहकारी यांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे कृषीपंप धारकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी उर्जामंत्री सोबत असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे त्यांच्या अधिनस्थ असलेले अधिकारी - कर्मचारी मात्र शेतकऱ्यांची गळचेपी करीत असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)