ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रानेच सावरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:18 AM2020-12-28T04:18:35+5:302020-12-28T04:18:35+5:30
भंडारा : कोरोना विषाणूने आख्खे जग स्तब्ध झाले होते. संपूर्ण अर्थव्यवस्था थांबली होती. सहा महिने कोणतीही आर्थिक ...
भंडारा : कोरोना विषाणूने आख्खे जग स्तब्ध झाले होते. संपूर्ण अर्थव्यवस्था थांबली होती. सहा महिने कोणतीही आर्थिक उलाढाल होत नसल्याने सरकारवरही अतिरिक्त आर्थिक ताण वाढला होता. मात्र अशा संकटकाळात ढासळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रानेच सावरण्याचे काम केले. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव व स्वत: च्या जीवाची भीती असतानाही लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ते आजतागायत कृषी विभागातीलअधिकारी कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील बळीराजाने न डगमगता आपले कर्तव्य निभावून कोरोना युद्धांची भूमिका निभावली. इतर जिल्ह्यात भाजीपाला, टोमॅटोला तब्बल शंभर रुपये किलोला मोजावे लागत होते. मात्र जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने केलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक योजनेतून सर्वसामान्य ग्राहकांनाही लाॅकडाॅऊन कालखंडात माफक दरात भाजीपाला मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कोरोनाने सर्वच क्षेत्रे बदलून गेली आहेत. अशा वेळी कृषी क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला जिल्ह्यातच नव्हे तर आंतरराज्य स्तरावर पोहोचला आहे. भाजीपाला लागवडीवर अनेक शेतकऱ्यांनी भर दिला त्यामुळे आजपर्यंत तीन पिढ्यांमध्ये कधी इतका दर मिळाला नाही मात्र यावर्षी इतका चांगला दर मिळाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे अशा भीतीमध्येही शेतकऱ्यांचा भाजीपाला नासाडी होऊ नये यासाठी कृषी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही सुविधा नसतानाही कोरणा योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली. यामध्ये काहींना मृत्यूचा सामना करावा लागला तर काहींना कोरोना बाधित व्हावे लागले. मात्र तरीही न डगमगता बळीराजा सह अनेकांनी आपले योगदान दिले. यावर्षी नैसर्गिक संकटांनी ही बळीराजाला पुरते हैराण करून सोडले सुरुवातीला पावसाचा खंड, तर त्यानंतर झालेली ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, महापूर व त्यानंतर धान पिकावर तुडतुड्यांचा झालेला प्रादुर्भाव यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला. मात्र अशाही संकटात सकारात्मक विचार करून भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याने तारले असे म्हणायला हरकत नाही. भंडारा तालुक्यातील चिखली येथील शेतकरी तानाजी गायधने यांनी बोलताना सांगितले की वरुणाने बळीराजालाही एक नवा धडा दिला आहे. आजपर्यंत शेतकरी कोणतेही नियोजन करत नव्हते मात्र आता आपण शेतकरी बचत गट, उत्पादक कंपन्यांच्यामार्फत आंतरराज्य तसेच इतर जिल्ह्यात दर्जेदार शेतमाल विक्री करू शकतो हे शिकलो.
जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची शासनाने तात्काळ दखल घेत शेतकऱ्यांना अतिवृष्टी महापूर व तुडतुड्याने झालेल्या नुकसानीची तात्काळ सर्वे करून बळीराजाला धीर दिला. हेक्टरी तेरा हजार रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले. यासोबतच अतिवृष्टीने घरे पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांनाही धीर देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला कोरोनाचा सकारात्मक परिणाम सरकारने कालखंडात आपले कामकाज ऑनलाईन करण्याचा घेतलेला निर्णय यामधून अनेक योजना राबवल्या. जिल्ह्याबाहेर रोजगारासाठी गेलेले तरुणीही आता शेती व्यवसायात आपली छाप पाडू लागले आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनात चांगली वाढ झाली आहे यापूर्वी नागपुर वरून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत होता मात्र जिल्ह्यातील भाजीपाला क्षेत्रात वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम शेतकरी ते थेट ग्राहक छोट्या-छोट्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांनाही योग्य दरात भाजीपाला मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणूचा विपरीत परिणाम काही महिने दिसून आला. कोरोनाचा झालेला उदय, कहर आणि आता अस्ताकडे कोरोनाची वाटचाल आपण अनुभवली आहे. परंतु हेही दिवस जातील आणि पुन्हा सोनेरी दिवस येतील या आशेने येणाऱ्या काळात निश्चितच सर्वांना चांगले दिवस येतील अशी आशा आपण करू शकतो. त्यामुळे कोरोनाचे दुष्परिणामच नाही तर काही चांगल्या गोष्टीही कोरोनाने आपल्याला शिकवल्या आहेत.
बळीराजासह कृषी कर्मचारीच खरे कोरोना योद्धे
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळाल्या नसतानाही अशा संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली. राज्यात सर्वाधिक मृत्यू कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे झाले तर अनेकांना कोरोना बाधित व्हावे लागले यामध्ये अनेकदा बळीराजाला मार्गदर्शन, शेतकरी ते थेट ग्राहक योजनेसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी परवानगी देण्याची भूमिका निभावताना अनेक जणांना कोरोनाने ग्रासले. मात्र अशाही कठीण संकटात अनेकांनी आपले कर्तव्य निभावलेच.
अतिवृष्टी, महापुर, तुडतुड्याचा फटका जिल्ह्यात २८,२९,३० ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी, महापुर आणि तुडतुड्याने धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा फटका ३८ हजार९३१ शेतकऱ्यांना बसला होता. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ८५४ हेक्टरवर धानाजी लागवड करण्यात आली होती. खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०१ 1 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता.पीक विम्याची अपेक्षित मदत मिळाली नसली तरी राज्यशासनाने मात्र बळीराजाला कमी का असेना पण वेळीच मदत देऊन मोठा आधार दिला हे विसरता येणार नाही.
अन्नदाते चे महत्त्व जगाला कळाले
कृषिप्रधान देशात शेतकरी मुलाशी लग्न करायला कोणी तयार होत नाही. मात्र लॉकडॉऊन कालखंडात सर्व जगाला पोसणारा बळीराजाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शेकडो वर्षांपासून कोणताही संप न करता रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतमाल विकून दुसऱ्यांना जगणारा बळीराजा कसा श्रेष्ठ आहे हे या कालखंडात अनेकांनी अनुभवले. त्यामुळे आज कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांचे महत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढले आहे.
कोरोनामुळे अख्खे जग थांबले होते. मात्र अशा कठीण प्रसंगी कृषी विभाग व जिल्ह्यातील बळीराजाने आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोना योद्ध्यांची भूमिका निभावली. लाॅकडॉऊन काळात शेतकरी ते थेट ग्राहक सिस्टीम उभारल्याने अनेकांना याचा फायदा झाला.
मिलिंद लाड,
उपविभागीय कृषी अधिकारी,भंडारा