कृषी विभाग म्हणतो, आठ हजार हेक्टरवरच नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:00 AM2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:43+5:30
भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीचा पाऊस झाला. संपूर्ण धान पीक आडवे झाले. कापणी झालेले कडपे ओले होऊन लोंब्यांना अंकुर फुटले आहे. शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनाम्यासाठी बहुतांश गावात कर्मचारी पोहोचले नाही. दरम्यान कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी प्राथमिक नजर अंदाज अहवाल शासनाला सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीच्या पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले असले तरी कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतात पंचनाम्यासाठी कर्मचारीच पोहोचले नाही. तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे विम्याचा लाभ मिळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीचा पाऊस झाला. संपूर्ण धान पीक आडवे झाले. कापणी झालेले कडपे ओले होऊन लोंब्यांना अंकुर फुटले आहे. शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनाम्यासाठी बहुतांश गावात कर्मचारी पोहोचले नाही. दरम्यान कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी प्राथमिक नजर अंदाज अहवाल शासनाला सादर केला. त्यात जिल्ह्यातील सात तालुक्यात आठ हजार ८० हेक्टर नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
प्रत्यक्षात जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असताना २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधित पावसामुळे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला. त्यात जिल्ह्यात बाधित गावांची संख्या ४५४ नमूद करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात एक लाख ९१ हजार २४१ हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी आठ हजार ८० हेक्टरचे नुकसान झाले असून ३३ टक्क्यांच्या आत १९८१ हेक्टर आणि ३३ टक्क्यांच वर ६०९९ हेक्टर असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
खरीपाचा सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत होते. नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. कमी कालावधीचा साधारण धान दिवाळीपुर्वी कापणीला आला. शेतकऱ्यांनी कापणीतून पुंजणे तयार केले.
कडपा वाळण्यासाठी साधारण आठ दिवसाचा कालावधी लागतो. याच सुमारास परतीचा पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. शेतात पाणी साचले.
ढगाळ वातावरणामुळे कडपा ओल्या राहून त्याला अंकुर फुटले. पावसामुळे अनेक ठिकाणचे धान काळे पडले असून बाजारात त्याला कवडीची किंमत नाही.