'शेती परवडत नाही, दारु विकू द्या' भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची अजब मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 07:30 AM2022-03-10T07:30:00+5:302022-03-10T07:30:02+5:30

Bhandara News दुकानदारांना दिलेल्या परवानगीप्रमाणेच आम्हालाही वाईन विक्रीची परवानगी द्या, अशी अजब मागणी भंडारा जिल्ह्यातील नीलज बुज येथील शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

'Agriculture is unaffordable, allow to sell liquor' Strange demand of farmers in Bhandara district | 'शेती परवडत नाही, दारु विकू द्या' भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची अजब मागणी

'शेती परवडत नाही, दारु विकू द्या' भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची अजब मागणी

Next
ठळक मुद्देथेट मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

युवराज गोमासे

भंडारा : मुख्यमंत्री साहेब, शेतीतून उत्पन्न होत नाही. सतत नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. शासन नुकसानभरपाई देत नाही. धानाला बोनसही मिळाला नाही. आर्थिक चटके सोसावे लागतात. अशा परिस्थितीत किराणा दुकानदारांना दिलेल्या परवानगीप्रमाणेच आम्हालाही वाईन विक्रीची परवानगी द्या, अशी अजब मागणी भंडारा जिल्ह्यातील नीलज बुज येथील शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. या मागणीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

जयगुनाथ गाढवे असे शेतकऱ्याचे नाव असून, त्यांची मोहाडी तालुक्यातील नीलज बुज येथे शेती आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा आपल्या पत्रातून त्यांनी मांडली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये मोठे वादळ झाले. त्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. गावातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली. परंतु शासनाने अद्याप कोणताही तोडगा काढला नाही. शासनाने गतवर्षीपासून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणे बंद केले. यामुळे प्रचंड आर्थिक चटके बसत आहेत. मुलांना शाळेत पाठवायचे कसे, त्यांचा शैक्षणिक खर्च कसा करायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मोठी दमछाक होत आहे. बाजार करायलाही खिशात पैसे नसतात. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्याला वाईन विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी गाढवे यांनी केली आहे. त्यांनी स्पीड पोस्टाने हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात गावात वादळ आले होते. अवकाळी पावसाने पीक नेस्तनाबूत केले. कुजलेल्या धानाच्या लोंबींना कोंब आले. १०० पोती धान होणाऱ्या माझ्या शेतात फक्त ४० पोती धान झाले. उदरनिर्वाह कसा चालवावा, हा प्रश्न आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाईन विक्रीची परवानगी द्या अशा मागणीचे पत्र पाठवले आहे.

-जयगुनाथ गाढवे, शेतकरी, नीलज बु., जि. भंडारा

Web Title: 'Agriculture is unaffordable, allow to sell liquor' Strange demand of farmers in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती