अक्षय तृतीयेचा मुहूर्त पुन्हा हुकला, लग्नसोहळे लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:52+5:302021-05-14T04:34:52+5:30
भंडारा : कोरोनाचे संकट सलग दुसऱ्यावर्षीही कायम असून यंदाही संचारबंदीच्या नियमामुळे लग्नसोहळे पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्याचे चित्र दिसून येत ...
भंडारा : कोरोनाचे संकट सलग दुसऱ्यावर्षीही कायम असून यंदाही संचारबंदीच्या नियमामुळे लग्नसोहळे पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न करण्याची जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात मोठी परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आल्याने गतवर्षी खेडोपाडी लपून-छपून होणारे विवाह सोहळेही आता लॉकडाऊन झाले आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या दिवसात दिसणारी लग्नाची धामधूम दिसेनाशी झाली आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकजण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. या शुभमुहूर्तावर लग्न करताना काहीही पाहण्याची गरज नाही, अगदी डोळे झाकून विवाह सोहळे करता येत असल्याची माहिती खरबी नाका येथील स्वीट ॲन्ड लव्ह सेलिब्रेशनचे संचालक विकी गिरीपुंजे यांनी दिली. मात्र यावर्षी कोरोना संचारबंदीमुळे अक्षय तृतीयेच्या विवाह मुहूर्तावर लग्नसोहळा करण्याच्या अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. कोरोना संसर्गात दोन तासात लग्न उरकण्यापेक्षा अनेकांनी लग्नसोहळाच पुढे ढकलला आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीसह अनेक शुभ कामे केली जातात. लग्नसोहळा तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यासाठी अनेकांची धडपड थांबली. अनेकांना विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ आली आहे. कोरोना संकटाने बुकिंग अगदी कमी झाले. कोरोना संसर्गाचा उद्रेक आणि शासनाने संचारबंदी लागू केल्याने अनेकजण लग्न रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहेत. खरबी (नाका) येथील स्वीट ॲन्ड लव्ह सेलिब्रेशनमध्ये सहा वर्षात अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला लग्न झाले नाही, असे घडले नाही. गत वर्षीही कोरोना संसर्गातही एक लग्नसोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडला होता. मात्र यावर्षी कोरोनात लग्न नको, म्हणून बुकिंग रद्द केल्याची माहिती आहे.
बॉक्स
शासकीय नियमांचा अडसर
कोरोनाचा उद्रेक असलेल्या ठिकाणी प्रशासनाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठी यंदा परवानगी दिलेली नाही. काही ठिकाणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठी कुणाचेही अर्ज घेतलेले नाहीत. विनापरवानगीने घरगुती लग्न केले, तर त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करणार असल्याचे सांगितल्याने, अनेकजण लग्न पुढे ढकलत आहेत. शिवाय कोरोना चाचणी, आरटीपीसीआर चाचणी, निवडक जणांचीच उपस्थिती... अशी सरकारने लग्नसोहळ्यासाठी बंधने घातली आहेत.
बॉक्स
मंगल कार्यालयांंचे गणित बिघडले
भंडारा शहरात जवळपास पंघरा ते वीस मंगल कार्यालये आहेत. मात्र यातील काहीमध्ये कोविड सेंटरची निर्मिती केली आहे, तर उर्वरित मंगल कार्यालये मात्र संचारबंदी आणि कोरोनाचा उद्रेक झाला असल्याने ओस पडली आहेत. क्वचितप्रसंगी लग्न झालेच, तरी सध्या प्रशासनाच्या जाचक अटींमुळे मंगल कार्यालयात मात्र कुणीही लग्न करत नाहीत. २५ वऱ्हाडी आणि दोन तासात लग्न अनेकांना शक्य होत नसल्याने अनेकांची लग्नासाठी टाळाटाळ होत आहेत. शासनाने २५ पाहुणे आणि दोन तासात लग्न आटोपण्याची अट घातली असल्यानेच अनेक मंडळी लग्न पुढे ढकलत आहेत.
कोट
माझ्या मुलीचे लग्न ११ एप्रिलला ठरले होते. पूर्ण तयारीही झाली, पाहुण्यांना पत्रिका वाटल्या. मात्र त्यानंतर कोरोना दिवसेंदिवस वाढतच चालल्याने शेवटी नाईलाजास्तव लग्न पुढे ढकलण्याचा पर्याय घेतला आहे. सर्व तयारी झाल्यानंतर ठरलेल्या तारखेत लग्न न झाल्याचे मनाला दु:ख होत आहे.
- छगनलाल दूधबरई, वधुपिता, तुमसर.
कोट
प्रशासनाने २५ पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली आहे. परंतु आमचे सर्व पाहुणेच जवळपास दोनशेच्या वर आहेत. शिवाय दोन तासात लग्न कसे शक्य आहे? यापेक्षा कोरोना कमी झाल्यावरच मुलीचे धूमधडाक्यात लग्न करण्याचा निर्णय आमच्या परिवारांनी घेतला आहे.
- शिलाबाई दूधबरई, वधुमाता, तुमसर.