अंमली पदार्थांपासून तरुणाईला सावध करा

By admin | Published: December 20, 2014 12:39 AM2014-12-20T00:39:41+5:302014-12-20T00:39:41+5:30

कमी दिवसात जास्त पैशांच्या लालसेने काही समाजकंटक समाजात नशेचा व्यवसाय करतात. याला काही जण बळीही पडतात.

Alert the young man from the drugstore | अंमली पदार्थांपासून तरुणाईला सावध करा

अंमली पदार्थांपासून तरुणाईला सावध करा

Next

भंडारा : कमी दिवसात जास्त पैशांच्या लालसेने काही समाजकंटक समाजात नशेचा व्यवसाय करतात. याला काही जण बळीही पडतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यात तरुणाईचा समावेश असल्याचे आढळून आले. चरस किंवा गांजा, ड्रग्स (हिरोइन) या सारख्या नशा उत्पन्न होणाऱ्या पदार्थांची भंडारा शहरासह अन्य तालुक्याच्या मुख्यालयीही नशा विकण्याचा हा गोरखधंदा सुरु आहे.
आयुष्याची होते राखरांगोळी
देशात बेरोजगारीचे मोठे संकट उभे आहे. दरवर्षी सुशिक्षीत युवकांचा जत्था निघत आहे. या वाढत्या बेरोजगारीकडे आजचा तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. बेरोजगार युवक आधीच आयुष्याच्या सुरवातीसाठी स्ट्रगल करतांना दिसतो. त्यात त्याला आलेले अपयश. यामुळे तो गांज्या, गुटका, ड्रग्स यासारख्या आमली पदार्थाच्या आहारी जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना आवश्यकतेनुसारच पैसे द्यावे, अवाजवी पैसे देऊन त्यांना व्यसनाच्या आहारी जाण्यास बाध्य करु नये. तसेच पोलिस प्रशासनाने सज्ज राहून आमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच परिसरात आम्ली पदार्थाची विक्रीच होऊ देवू नये.
-मदन रामटेके, पं.स. सदस्य, साकोली.
व्यसनामुळे मुले गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात
गांज्या व ड्रग्सच्या सेवनाने सुरवातीला युवकांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. त्यामुळे ते या व्यसनाच्या आहारी जातात. मात्र हळुहळु त्यांना ही सवय लागल्या नंतर त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही. वारंवार त्याच त्या वस्तुशासाठी ते काहीही करण्यासाठी तयार होतात. वेळ आली तर या आमली पदार्थांच्या सेवनाकरीता चोरी, खून यासारखे प्रकार करुन आपली ईच्छा पूर्ण करतात. त्यामुळे प्रशासनाने यावर कठोर भूमीका देऊन हे पदार्थ गावात व परिसरात मिळाली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करावे तसेच चित्रपट व टिव्ही वरील कार्यक्रमात याविषयी दाखविण्यात येऊ नये.
-डॉ. राजश्ो चंदवानी, साकोली
चोरपावलांनी लागते मादक द्रव्याचे व्यसन
मादक द्रव्याचे व्यसन हे कोणत्याही वयात नकळतपणे लागू शकते. हे व्यसन चोर पावलानी येते. कुटूंबातील कलह, विभक्त कुटूंब, अति लाडामुळे बेशिस्त वाढलेली मुले, पैशाचे हिशोब न मागणे, वाईट संगत, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे आदी कारणांमुळेही मादक द्रव्याचे व्यसन लागत असते. यावर वेळीच नियंत्रण न केल्यास एकलकोंडीपणा, चोरी करणे, अपघात, अपंगत्व येण्याची शक्यता असतो. समुपदेशन, मैदानी खेळ, व्यायाम, ईश्वरभक्ती, मेडीटेशन, आदर्श लोकांचे चरित्र वाचन केल्यास या समस्येवर निश्चितपणे नियंत्रण मिळविता येवू शकते. समाजात वावरताना प्रत्येकाने सामाजिक सुरक्षीतता यामुळे धोक्यात येणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- डॉ. विक्रम राखडे, पवनी
दुर्लक्षामुळे संस्कृतीवर पडतोय घाला
आदीच्या काळात संयुक्त कुटूंब पध्दतीमुळे तरुणांवर किंवा किशोरवयीन मुलांवर सहजतेने लक्ष ठेवता येत होते. आधुनिक काळात विभक्त कुटूंब पध्दतीमुळे समाज संस्कृतीवर विपरित परिणाम होत आहे. घराबाहेर पडलेली मुले काय करतात याची जाणीव ही पालकांना नसते. नुसत्या प्रशासनाला दोष देवून चालणार नाही. खुल्या बाजारात गांजा किंवा चरस मिळत असेल व त्याकडे आपण पाहूनही दुर्लक्ष करित असू तर यात सर्वात मोठी चूक आपलीच आहे. झटपट पैसा कमविण्याचा नादात तरुणाईला या व्यसनाकडे ओढले जात आहे. असे नाही की यात श्रीमंताचीच मुले ओढली गेली मध्यम कुटूंबासह गरीबांचे मुलेही या व्यसनाकडे वळली आहे. संस्काराचा पगडा लहानपणापासून भक्कम होणे गरजेचे आहे.
- लक्ष्मण साखरे, खुटसावरी
पोलिसांचीही जागरुकता महत्वाची
चरस, अफिम, ड्रग्स यासारख्या मादक द्रव्यांची तस्करी शहर असो की ग्रामीण भागात होत असते. मादक द्रव्य कुठून येते, ही तस्करी कोण करतो? याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून वेळोवेळी मिळत असते. कधीकधी तस्करी करणारे एक पाऊल पोलिसांचा पुढे असतात. माहिती मिळताच पोलिस अधिकारी धाडही घालतात. मात्र फितुरीमुळे तस्कर हाती लागत नाही. २० रुपयांचा गांजा आणि १०० रुपयांचा हिरोईनची पुडी बाजारात मिळत असताना, ही पुडी मात्र पोलिसांना का मिळत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे. जागरुक असूनही जागरुक नसणे ही बाब अतिशय गंभीर आहे. माहिती मिळाल्यावरही कारवाई होत नसेल तर तस्करी करणाऱ्यांची व तरुणाला व्यसनाकडे ओढण्याची हिम्मत दिवसेंगणीक वाढत चालली आहे. पोलिसांनी या विषयावर खरच जागरुक राहणे गरजेचे आहे.
- नरेंद्र पोटवार, लाखनी

Web Title: Alert the young man from the drugstore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.