रेतीतस्कर झाले पुन्हा अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 05:00 AM2022-05-09T05:00:00+5:302022-05-09T05:00:25+5:30
विदर्भासह राज्य व राज्याबाहेर वैनगंगासह तिच्या उपनद्यांतील रेतीला अनन्यसाधारण मागणी आहे. उच्च दर्जाची ही रेती अवैध मार्गाने खणून अनेकजण गब्बर झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांसह मंडळ निरीक्षक, तलाठी तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तस्करांनी हल्ले केले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून यांपैकी कुणाचाही जीव गेला नाही. मात्र रेतीच्या अवैध वाहतुकीने आतापर्यंत अनेक निष्पाप लाेकांना बळी गेला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आठ दिवसांपूर्वी वडेगाव रेतीघाटावर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने धाड घालून रेतीसह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला हाेता. आता कारवाईचा बडगा शांत झाल्यानंतर रेतीतस्कर पुन्हा अलर्ट झाले आहेत. चाेरी-छुप्या मार्गाने रेतीचा अवैध व्यवसाय सुरू झाला आहे. साेन्यासारख्या रेतीची सुरक्षा करणारा कुणी वाली नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विदर्भासह राज्य व राज्याबाहेर वैनगंगासह तिच्या उपनद्यांतील रेतीला अनन्यसाधारण मागणी आहे. उच्च दर्जाची ही रेती अवैध मार्गाने खणून अनेकजण गब्बर झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांसह मंडळ निरीक्षक, तलाठी तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तस्करांनी हल्ले केले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून यांपैकी कुणाचाही जीव गेला नाही. मात्र रेतीच्या अवैध वाहतुकीने आतापर्यंत अनेक निष्पाप लाेकांना बळी गेला आहे.
एसडीओंवरील हल्ल्याची घटना ताजीच आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मुख्य नेतृत्वात माेठी धाडसी कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतरही रेतीतस्करी सुरू हाेती, हे या धाडसी कारवाईचे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल; परंतु ही फक्त एका रेतीघाटाची कारवाई हाेती.
जिल्ह्यात एकेकाळी ९० पेक्षा जास्त रेतीघाट हाेते. ती संख्या राेडावून आता ५० च्या जवळपास आली आहे. फक्त गतवर्षीच्या शासकीय नाेंदीवर नजर घातल्यास १४ रेतीघाटांचे लिलाव झाले हाेते. काेराेनाकाळात झालेली तूटही रेतीमाफियांनी या चार महिन्यांत काढली असावी, एवढी लूट केली आहे.
शासकीय संपत्तीची ही खुलेआम लूट करण्यामागे राजकीय पाेशिंदेही मागे नाहीत. रेतीतस्कर सैराट तर अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये कारवाई संदर्भातच भीतीचे वातावरण आहे. सेटिंगचा मामला टाॅप टू बाॅटम परफेक्ट असला तरी इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही, असा संदेशही रेतीतस्कर हल्ल्यातून देत आहेत.
रेती घाटांचा लिलाव कधी?
- हवे असलेले दर रेती घाटांना मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक घाटांचा लिलाव गतवर्षी झाला नाही. यावर विभागीय स्तरावरुन मार्गदर्शनही मागविण्यात आले हाेते. आता तस्करांसाठी रान माेकाट करण्यापेक्षा रेतीघाटांचा लिलावतरी करावा अशी जनसामान्यांची मागणी आहे.