कृषी केंद्रासाठी लाच मागणारे चौघे जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:50 PM2018-06-04T22:50:05+5:302018-06-04T22:50:19+5:30
लाखनी तालुक्यातील मांगली गावात कृषी केंद्र सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या चार जणांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली. ही कारवाई सोमवारला दुपारी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी तालुक्यातील मांगली गावात कृषी केंद्र सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या चार जणांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली. ही कारवाई सोमवारला दुपारी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सरपंच प्रशांत भैय्याजी मासूरकर (३६), ग्रामसेवक मेघा झलके (३०), सदस्य माधव अर्जुन वालदे (५२) व शिपाई राजकुमार उमराव वाघाडे (४४) यांचा समावेश आहे. तक्रारदाराला स्वत:च्या मांगली गावात रासायनिक खते, किटकनाशके व बियाणे विक्रीकरीता कृषी केंद्र सुरू करावयाचे होते. यासाठी त्यांनी मांगली ग्रामपंचायत कार्यालयात १८ एप्रिल रोजी नाहरकत प्रमाणपत्रासाठी रितसर अर्ज केला होता. मात्र हे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामपंचायत कडून वारंवार टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, शिपाई राजकुमार वाघाडे यांनी तक्रारदाराच्या मोठ्या भावाला भेटून नाहरकत प्रमाणपत्रासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. ही बाब तक्रारदाराला कळल्यानंतर त्यांनी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हा प्रकार सांगितला. त्यानंतर पथकाने शुक्रवार व शनिवारला सापळा पडताळणी केली. त्यावरून सोमवारला सापळा रचून शिपाई राजकुमार वाघाडे याला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ अटक केली.
याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य व शिपाईविरूद्ध पालांदूर पोलिसांनी गुन्हे नोंदवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी चौघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, प्रतापराव भोसले, सहायक फौजदार गणेश पदवाड, शिपाई गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, शेखर देशकर, कोमल बनकर, रसिका कंगाले, दिनेश धार्मिक यांनी केली.