थर्टी फर्स्टला रात्री 8.30 नंतर सर्व बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 05:00 AM2021-12-31T05:00:00+5:302021-12-31T05:00:51+5:30
राज्यात ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा प्रसार अलीकडे वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळे, हॉटेल्स आदी ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ नागरिक एकत्र आले तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात नवीन वर्षाच्या स्वागतावर निर्बंध आणण्यात आले आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी असल्याने नववर्षाच्या स्वागताची अनेकांनी जंगी तयारी केली होती. मात्र, वाढत्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला. थर्टी फर्स्टच्या रात्री ८.३० नंतर सर्व बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या तरुणाईला मोठा झटका बसला.
राज्यात ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा प्रसार अलीकडे वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळे, हॉटेल्स आदी ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ नागरिक एकत्र आले तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात नवीन वर्षाच्या स्वागतावर निर्बंध आणण्यात आले आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात कोणताही कार्यक्रम रात्री ८.३० नंतर घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष देण्यासाठी शहरी भागात मुख्याधिकारी, ग्रामीण भागात तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलीस यांचे पथक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
अनेकांनी नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. परंतु आता ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे निर्बंध लागल्याने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. आता अगदी साधेपणात स्वागत करावे लागेल.
पर्यटनस्थळावर कार्यक्रमांना बंदी
- भंडारा जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटक आणि नागरिकांना प्रवेशास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. रावणवाडी, गोसेखुर्द, चांदपूर, कोरंभी यासह इतर ठिकाणी कार्यक्रमांना पूर्णत: मज्जाव राहणार आहे. कोरोना संसर्गामुळे तरुणाईला नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळा ऐवजी आपल्या घरीच पार्टी करावी लागेल.
असा आहे आदेश
- जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, सर्व प्रकारची पर्यटन स्थळे येथे नवर्षाच्या स्वागतासाठी जमणाऱ्या गर्दीस मज्जाव करण्यात येत आहे.
- हॉटेल, रेस्टॉरंट यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशाच्या अधीन राहून नमूद वेळेत सुरू ठेवता येईल.
- नववर्षानिमित्त कार्यक्रम, डीजे पार्टी, जल्लोष, गर्दी होईल असे कार्यक्रम घेता येणार नाहीत.
- जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारचा जमाव होणाऱ्या कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
- आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई.