टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:38 PM2019-05-21T23:38:21+5:302019-05-21T23:38:41+5:30
जिल्ह्यात नियोजनाचे काम उत्तमरित्या सुरु असून टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव आभा शुक्ला यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात नियोजनाचे काम उत्तमरित्या सुरु असून टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव आभा शुक्ला यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा सभेत त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अपर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी विलास भाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी गोयल यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य परिस्थितीची माहिती दिली. २०१८-१९ च्या खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात ट्रिगर दोन लागू झाला आहे. त्यात मोहाडी, पवनी व लाखनी तालुक्यामध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलतींना मंजुरी देण्यात आली. राज्यातील दुष्काळ घोषीत झालेल्या १५१ तालुक्या व्यतिरिक्त जून ते सप्टेंबर २०१८ च्या कालावधीत ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झालेल्या इतर तालुक्यातील २५८ महसूल मंडळात शासनाने दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी व पवनी तालुक्यातील आमगाव महसूल मंडळाचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात ६५ कामे प्रस्तावित आहे. तर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल अंतर्गत १२ नवीन योजना सुरु आहेत. जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा होत नाही. पाणीटंचाई व दुष्काळ परिस्थिती निवारणार्थ नरेगा अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १२८७ कामे सुरु असून त्यावर ६६ हजार १३९ मजुरांची उपस्थिती आहे. जलयुक्त शिवारची ५० टक्के कामे नरेगांतर्गत घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
१२९ गावांत ५० पेक्षा कमी पैसेवारी
खरीप हंगाम २०१८ ची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात १२९ गावांत ५० पेक्षा कमी पैसेवारी असून ७१६ गावे ५० पैशापेक्षा जास्त पैसेवारीचे आहेत. काही तालुक्यात अतिरिक्त पीक कापणी प्रयोग घेऊन शासनास प्रस्ताव पाठविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
१२० कोटींचे पीक कर्ज वाटप
जिल्ह्यात खरीप नियोजन करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटप सुरु असून ४३८ कोटींचे उद्दिष्ट्ये जिल्ह्याला सध्या १२० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात चारा टंचाई नसून चारा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.