फेरमतदानातील सर्वच ईव्हीएम ‘आॅल ईज वेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:43 PM2018-05-30T22:43:09+5:302018-05-30T22:43:20+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी २,१४९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्याच्या तक्रारी सुरू झाल्या.
नंदू परसावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी २,१४९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. दरम्यान, मंगळवारला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही मतदान केंद्रांवर फेरमतदासाठी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यांतर ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार बुधवारला घेण्यात आलेल्या ४९ मतदान केंद्रातील कोणत्याही ईव्हीएमध्ये बिघाड आला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वच ईव्हीएम ‘आॅल ईज वेल’ असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवारला शेकडो ईव्हीएममध्ये बिघाड का आला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी गुजरात राज्यातील सुरत येथून ईव्हीएम मागविण्यात आले होते. याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आक्षेप घेतला होता. कोणत्याही निवडणुकीसाठी जेवढ्या ईव्हीएमची गरज असते त्यापैकी १० टक्के मशिनची रॅण्डम पद्धतीने तपासणी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याचे सांगून या निर्देशांनुसार ईव्हीएमची तपासणी करण्याची मागणी खा.प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांना केली होती. परंतु अखेरपर्यंत या ईव्हीएमची तपासणी करण्यात आली नव्हती. त्यानंतर २८ मे रोजी मतदानाच्या दिवशी या ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडाचा प्रकार समोर आला. त्यानंतर खा.पटेल यांनी फेरमतदान घेण्याची मागणी करून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली.
त्यामुळे फेरमतदानासाठी निवडणूक प्रशासनाने आयोगाकडे ईव्हीएमची मागणी केली. त्यानंतर आयोगाने महाराष्ट्रातील सांगली व मध्यप्रदेशातील कांकेर येथून ईव्हीएम पाठविले. हेच ईव्हीएम बुधवारला ४९ मतदान केंद्रावर फेरमतदानासाठी पाठविण्यात आले. त्यापूर्वी गुजरातहून आणलेल्या ईव्हीएम मुख्यालयात जमा करून ठेवलेल्या आहेत. दरम्यान, मंगळवारला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तातडीने रूजू झालेल्या कादंबरी बलकवडे या संपूर्ण मतदान केंद्रांवर लक्ष ठेऊन होत्या. गुरूवारला त्यांच्याच मार्गदर्शनात मतमोजणी होणार आहे.