विकास निधी खर्च करण्यात तीनही आमदार आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 05:00 AM2022-04-07T05:00:00+5:302022-04-07T05:00:44+5:30
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील पवनी आणि भंडारा या दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे वर्षभरात केली आहेत. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांत विकासकामे करून आपला वर्षभराचा संपूर्ण निधी खर्च केला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली मतदारसंघात संपूर्ण चार कोटी रुपयांचा निधी गतवर्षात खर्च करून मतदारसंघाच्या विकासाला हातभार लावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सार्वजनिक हिताची कामे आमदार निधीतून करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक आमदाराला चार कोटींचा निधी दरवर्षी दिला जातो. भंडारा जिल्ह्यातील तीनही आमदारांनी त्यांना मिळालेला चार कोटी रुपयांचा संपूर्ण निधी विकासकामांवर खर्च केला आहे.
वैयक्तिक लाभाची कामे सोडून सर्व प्रकाराची सार्वजनिक हिताची कामे आमदार विकास निधीतून करता येतात. भंडारा जिल्ह्यात तीनही आमदारांनी रस्ते, समाजमंदिर, सभागृह, विंधन विहिरी, शाळांना संगणक आणि वाचनालयांना पुस्तके देण्यासाठी केला आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील पवनी आणि भंडारा या दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे वर्षभरात केली आहेत. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांत विकासकामे करून आपला वर्षभराचा संपूर्ण निधी खर्च केला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली मतदारसंघात संपूर्ण चार कोटी रुपयांचा निधी गतवर्षात खर्च करून मतदारसंघाच्या विकासाला हातभार लावला आहे.
सर्वाधिक खर्च रस्ते बांधकामावर
जिल्ह्यातील तीनही आमदारांनी सर्वाधिक विकासनिधी रस्ते बांधकामावर खर्च केला आहे. ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करण्यावर त्यांनी भर दिला.
समाजमंदिर सभागृहावर भर
सार्वजनिक हितासाठी जिल्ह्यातील तीनही आमदारांनी समाजमंदिर आणि गावांमध्ये सभागृह बांधकामासाठी निधी खर्च केला असून गावकऱ्यांसाठी सुविधा निर्माण केली.
शाळांना संगणक, वाचनालयांना पुस्तके
आमदार नाना पटोले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्या विकासनिधीतून शाळांना संगणक आणि वाचनालयाला पुस्तके दिली आहेत. २० शाळांमध्ये विकासनिधीतील संगणक आहेत.
चार कोटींपैकी खर्च किती
नाना पटोले : संपूर्ण चार कोटी निधी खर्च
साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी वर्षभरात चार कोटींचा संपूर्ण निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खर्च केला आहे.
नरेंद्र भोंडेकर : विकास निधी खर्चात अव्वल
भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर विकासनिधी खर्च करण्यात अव्वल ठरले आहेत. त्यांनी चार कोटींचा निधी मतदारसंघाच्या विकासावर खर्च केला.
राजू कारेमोरे : रस्ते, समाजमंदिराला निधी
तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी संपूर्ण चार कोटींचा निधी खर्च केला असून, त्यातील बहुतांश निधी रस्ते, समाजमंदिर, विंधन विहिरी यावर खर्च केला.
आमदार निधी आता पाच कोटी
मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदारांना आतापर्यंत चार कोटी रुपये निधी दिला जात होता. मात्र, आता हा निधी पाच कोटी रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे मोठ्या प्रमाणात केली जातील.
सुनील मेंढे : कोविड साहित्य खरेदीसाठी निधी
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे खासदार झाल्यानंतर २०१९-२० या आर्थिक वर्षात पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे २०२०-२१, २०२१-२२ या दोन वर्षांत निधी गोठविण्यात आला. मात्र, त्यांनी आपल्याला मिळालेला बहुतांश विकासनिधी लोकहिताच्या कामावर खर्च केला. गतवर्षी भंडारा व गोंदिया जिल्ह्याला कोविड साहित्य खरेदीसाठी २५ कोटी रुपये खासदार विकास निधीतून दिले आहेत.