कोपलेल्या वैनगंगेत आयुष्याची कमाईच गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 09:40 PM2020-09-02T21:40:43+5:302020-09-02T21:42:29+5:30
जीवनदायी वैनगंगेने आतापर्यंत भरभरून दिले. मात्र शनिवाराच्या रात्री वैरीण म्हणून गावात शिरली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पै-पै जोडून संसार उभा केला. चिलापिलांसाठी निवाराही बांधला. जीवनदायी वैनगंगेने आतापर्यंत भरभरून दिले. मात्र शनिवाराच्या रात्री वैरीण म्हणून गावात शिरली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते केले. आता पूर ओसरला असून भयभीत डोळ्यांनी घरात काही शिल्लक आहे काय याचा शोध घेत पूरग्रस्त आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. तीन दिवसांच्या विळख्यानंतर आता पूरग्रस्त गावातील विदारक चित्र कुणालाही हेलावून टाकल्याशिवाय राहत नाही.
भंडारा जिल्ह्यातून विशाल पात्र असलेली वैनगंगा वाहते. भंडारा जिल्ह्याची ओळख आणि जीवनदायी वैनगंगा होय. या वैनगंगेच्या तिरावर सुपिक जमीन असून तिच्याच अंगाखांद्यावर खेळून अनेकांनी समृद्धीची स्वप्न पाहिली. मात्र शनिवारच्या रात्री अचानक वैनगंगा कोपली. महापुराचे पाणी कीर्र अंधारात चोर पावलांनी शिरले. पाहता - पाहता संपूर्ण गाव कवेत घेतले. कुठे जावे असा प्रश्न होता. सर्वत्र अंधार आणि पुराच्या पाण्याचा विळखा होता. असे भंडारा तालुक्यातील जुनी पिंपरी येथील पूरग्रस्त सांगतात.
रात्री पूर चढत असल्याने अनेकांनी गावातील मंदिराचा आश्रय घेतला. दुसऱ्या दिवशी आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. आता ही मंडळी तात्पुरत्या शिबिरात आश्रयाला आहेत. आपल्या घराचे काय नुकसान झाले याचा अंदाज घेण्यासाठी अनेक जण चिखल तुडवत गावात पोहचत आहेत. मात्र घराचे दृष्य पाहून जणू आभाळ फाटून पायाखालची जमीन सरकल्याचा भास होत आहे. घरात असलेले सर्व वैनगंगेने वाहून नेले. आता सर्व प्रतीक्षा आहे ती शासनाच्या मदतीची. शासन प्रशासनाने भेदभाव न करता मदत द्यावी अशी अपेक्षा आहे.