तुमसरात हागणदारीमुक्तीचा ‘व्हॅलेंटाईन डे’
By admin | Published: February 15, 2017 12:25 AM2017-02-15T00:25:33+5:302017-02-15T00:25:33+5:30
व्हॅलेंटाईन डे म्हटला की, सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो प्रियकर - प्रियसी यांच्यातील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.
गुलाब पुष्प देऊन मार्गदर्शन : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचा अभिनव उपक्रम
प्रशांत देसाई भंडारा
व्हॅलेंटाईन डे म्हटला की, सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो प्रियकर - प्रियसी यांच्यातील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आनंद द्विगुणीत केल्या जातो. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने आज व्हॅलेंटाईन साजरा केला. मात्र हा व्हॅलेंटाईन डे होता स्वच्छता पाळण्यासाठी व शौचालयाच्या बांधणीसाठी. या अभिनव उपक्रमाने ग्रामस्थही आश्चर्यचकीत झाले.
मागील पंधरवाड्यापासून स्वच्छता मिशन कक्षाने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पुष्पगुलाब देऊन त्यांना हागणदारीमुक्तीचा संदेश देत आहे. मात्र आजचा दिवस हा खरोखरच एका अर्थाने नवलाईचाच ठरला आहे. उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुधाकर आडे, तुमसरचे गटविकास अधिकारी विजय झिंगरे यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता मिशन कक्ष शौचालय बांधणीवर जोर देत आहे.
आज घेण्यात आलेल्या अभिनव उपक्रमात माहिती शिक्षण व संवाद सल्लागार राजेश येरणे, समुह समन्वयक शशीकांत घोडीचोर, विजय बागडे यांनी पुढाकार घेतला. बाजारातून गुलाबाची फुले खरेदी करून ज्यांच्याकडे शौचालय नाही किंवा शौचालय असतानाही उघड्यावर प्रात:विधी उरकतात अशांना त्यांनी गुलाबाचे फुल देऊन शौचालय बांधणीसाठी मनधरणी केली.
अनेकांनी त्यांच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाला सहकार्य करून शौचालयाचे काम तातडीने करण्याचे आश्वासन दिले.
या चमूने तुमसर तालुक्यातील हसारा, हरदोली, आंबागड, बपेरा (आंबागड) या गावात हा अभिनव व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यावेळी त्यांना काही अडचणीही आल्यात. मात्र या पथकाने त्या लिलया सोडविल्या. मागील काही दिवसांपासून भल्या पहाटे हागणदारीमुक्तीचे पथक गावात दाखल होऊन ग्रामस्थांना गुलाबाचे फुल देत आहेत. याचा धसका अजूनही अनेक ग्रामस्थांमध्ये आहे. त्या धसक्यातून आज या व्हॅलेंटाईन डे च्या गुलाबपुष्पाने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
यावेळी हसारा येथील सरपंच विजय वानखेडे, सदस्य उषा आगाशे, दुर्गा कोकासे, वंदना कतरे, संघमित्रा रहांगडाले, सचिव प्रदीप चामाटे, आशाइंदू डहाटे, दुर्गा वनवे, जयशंकर राऊत, बपेरा येथील मुख्याध्यापिका आम्रापली बाराहाते, हरदोली येथील सरपंच कलावंता पटले, लक्ष्मी पटले यांनी त्यांना सहकार्य केले. गृहभेटीतून केलेल्या या अभिनव उपक्रमाने ग्रामस्थही भारावले.
नवविवाहितेसाठी बांधले शौचालय
हसारा येथील सुशिला मोहतुरे या महिलेच्या मुलाचा विवाह अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तिला शौचालय बांधण्याचे सांगितले. मात्र ही बाब तिला पटली नव्हती. पथकाने तिच्या घरी येणाऱ्या नवविवाहितेला उघड्यावर शौचास पाठविणार काय? यामुळे त्यांच्या कुटुंबियांची इज्जत राहील काय? असे नानाविध प्रश्न केल्यानंतर सुशिलाने शौचालय बांधण्याचे ठरविले. आता त्यांच्या शौचालयाचे काम अंतिम टप्प्यात असून आज त्यांचे व त्यांचा मुलगा तेवेंद्र यांचे गुलाब फुलाने स्वागत केले.
शालेय बालकांची मदत
बपेरा (आंबागड) येथे २० ते ३० शौचालय बांधकाम अंतिम टप्प्यात आहेत. त्या गावातील शाळेत पथकाने भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना शौचालयाची माहिती दिली. विद्यार्थी राणी दमाहे, सीमरन मोहतुरे, मयूर दमाहे, दिलवर बावणे या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांना शौचालय बांधणे व त्याचा वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.