प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:57+5:302021-07-23T04:21:57+5:30
गरीब लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. या केंद्रात सामान्य गरीब लोकांवर तातडीच्या वेळी भरती करून ...
गरीब लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. या केंद्रात सामान्य गरीब लोकांवर तातडीच्या वेळी भरती करून उपचार केले जातात. तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व इतर कार्य आरोग्य केंद्रातर्फे चालविले जाते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावातील नाल्या तुडुंब भरले आहेत. दूषित पाणी प्यालाने पावसाळ्यात अतिसार व साथीचे आजार उद्भवत असतात. कोंढा येथील बुधाजी आळे व त्यांच्या कुटुंबात तीन लोकांना अतिसाराचा त्रास झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी व परीचारीका यांनी बुधाजी आळे यांना तुम्हाला सलाईन लागत नाही म्हणून घरी परत पाठविले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार न झाल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी योग्य उपचार केले असते तर त्यांचा प्राण वाचला असता असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण उपचारासाठी गेल्यास त्यांच्यावर थातूरमातूर उपचार करून त्यांना घरी परत पाठविले जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अतिसार व इतर रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यास त्यांच्यावर योग्य उपचार करावे, अशी मागणी कोंढा येथील ग्रामपंचायत सदस्य व तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमित जीभकाटे यांनी केली आहे.