शिक्षकांना ॲन्टिजेन चाचणीची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:00 AM2020-11-25T05:00:00+5:302020-11-25T05:00:07+5:30
जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांची चाचणी कधी होणार आणि शाळा सुरू कशा करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआर चाचणीशिवाय शाळेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास महत्वाचा अडसर ठरलेली आरटीपीसीआर चाचणी ऐवजी आता ॲन्टिजेन चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र भंडारा शहर, जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कोविड अनुशंगाने लक्षणे असणाऱ्यांना मात्र आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सोमवारी याबाबत आदेश निर्गमित केल्यानंतर शिक्षकांचा जीव भांड्यात पडला. मंगळवारी अनेक शिक्षकांनी आपली ॲन्टीजेन चाचणी करण्यासाठी कोरोना केअर सेंटरवर धाव घेतली.
जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांची चाचणी कधी होणार आणि शाळा सुरू कशा करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआर चाचणीशिवाय शाळेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाच शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देशित केले होते. आरटीपीसीआर चाचणी करून अहवाल येण्यास मोठा विलंब लागण्याची शक्यता होती. अशा स्थितीत मुलांना शाळेत पाठवावे की नाही, अशी चिंता पालाकांना तर शाळा व्यवस्थापन समितीमध्येही गोंधनाळी स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी ॲन्टीजेन चाचणी संदर्भात मागणी केली होती. यावरून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ॲन्टीजेण चाचणी करण्यास मुभा दिली. ॲन्टीजेन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देशित केले. मात्र भंडारा शहर, जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रातील आणि कोविडची लक्षणे आढळणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मात्र आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
२०२ शाळा सुरू
जिल्ह्यात पहिल्या दिवशी शाळा सुरू करताना काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी मात्र स्थिती सामान्य होवून जिल्ह्यात २०२ शाळा सुरू झाल्या. जिल्ह्यात ३४२ शाळा असून तेथे ६६ हजार ५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तर ३१४८ शिक्षक कार्यरत आहेत. आता ॲन्टीजेन चाचणी होणार असल्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रशासनाने ॲन्टीजेन चाचणी करण्याची परवाणगी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक ॲन्टीजेन चाचणी करीत आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्व नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील.
-संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी, भंडारा.