जिल्ह्यातील शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:05+5:302021-06-18T04:25:05+5:30

भंडारा : जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाने उघाड दिल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतशिवारात मशागतीच्या ...

Almost all the pre-sowing tillage works in the farms of the district | जिल्ह्यातील शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग

जिल्ह्यातील शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग

Next

भंडारा : जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाने उघाड दिल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतशिवारात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी नांगरणी, वखरणी तसेच धानाची नर्सरी टाकण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गतवर्षी जिल्ह्यात आलेला महापूर व तुडतुडा रोगामुळे शेतकऱ्यांच्या हाती खरीप हंगामात अल्प उत्पादन आले होते. त्यामुळे यावर्षी नव्या उमेदीने शेतकरी खरिपाची तयारी करू लागले आहेत. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, बियाणे उगवणक्षमता तसेच सोयाबीन, तूर पिकासाठी आधुनिक पद्धतीने लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत. भंडारा तालुक्यातील चिखली येथे तानाजी गायधने यांच्या शेतावर रुंद सरी वरंभा पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली. भंडारा तालुका कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणीचे आवाहन करण्यात येत आहे. कृषी विभागाने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बांधावर खते पोहोचविण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. अनेक शेतकरी गटामार्फत शेतकऱ्यांना बियाणे, खते पोहोचविण्यात येत आहेत. संततधार पाऊस नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबासह आपल्या शेतात बांधबंदिस्ती, कचरा वेचणे, झुडपे तोडणे, वखरणीसारख्या कामात व्यस्त आहेत. एकीकडे पीक कर्जासाठी धावपळ तर दुसरीकडे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी बियाणे खते घरी आणून ठेवण्याची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

बॉक्स

भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढणार

जिल्ह्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी धान, सोयाबीन पिकासोबतच भाजीपाला पिकांकडे कल वाढवला आहे. अनेक जण यावर्षी मिरची तसेच भाजीपाला पिकांकरिता मल्चिंग, ड्रीपची कामे करीत आहेत. भाजीपाला पिकासाठी ड्रिप, मल्चिंगचा वापर केल्यास पाण्यामध्ये बचत होते. सोबतच ताणाचे व्यवस्थापन करता येत असल्याने शेतकऱ्यांचा अधिक कल मल्चिंगवर भाजीपाला लागवड करण्याकडे कल आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांकडून बी-बियाणे खते खरेदी करण्याचे काम सुरू आहे.

कोट

शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामध्ये खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी करू नये. आपल्या गावातील शेतकरी गटांमार्फत शेतकऱ्यांनी लागणाऱ्या खते, बियाण्याची मागणी गटांमार्फत केल्यास त्यांना बांधावर खते पोहोच या उपक्रमांतर्गत कृषी केद्रांकडून बियाणे पोहोचवले जाणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

-प्रदीप म्हसकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भंडारा

Web Title: Almost all the pre-sowing tillage works in the farms of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.