'त्या' तीन जिवलग मित्रांचा अखेरचा प्रवासही सोबतच; शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 04:01 PM2022-08-31T16:01:14+5:302022-08-31T16:04:33+5:30
गावालगतच्या मुरुमाच्या खाणीत (बोडी) पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.
(पवनी) भंडारा : ते तिघेही बालपणापासूनचे सवंगडी. कुठेही जायचे तर सोबतच. शाळेतही एकाच वर्गात. त्यांची मैत्री सर्व गावाला माहीत. मात्र एका बेसावध क्षणी या तीन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाला. पवनी तालुक्यातील अत्री येथे मंगळवारी दुपारी तिघांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. जिवलग मित्रांचा सोबतच अखेरचा प्रवास सुरू झाला तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. कुटुंबीयांवर तर आभाळच कोसळले.
पवनी तालुक्यातील अत्री येथे मुरूमाच्या खाणीत पोहायला गेलेले प्रणय योगीराज मेश्राम (१७), संकेत बालक रंगारी (१७) आणि साहिल नरेश रामटेके (१९) यांचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी (दि. २९) दुपारी तिघेही संकेतच्या शेतात सुरू असलेला मोटारपंप पाहण्यासाठी गेले होते. तिघांचे हातपाय चिखलाने भरले होते. हातपाय धुण्यासाठी मुरूमाच्या खाणीत उतरले. तेथे पोहण्याचा मोह आवरला नाही आणि बुडून मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. या घटनेने संपूर्ण पवनी तालुक्यात शोककळा पसरली.
पोहायला जाणे जीवावर बेतले; मुरुमाच्या खाणीत तीन मुलांना जलसमाधी
मंगळवारी अड्याळ येथे उत्तरीय तपासणी करून तिघांचे मृतदेह गावात आणले. त्यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश आसमंत भेदून टाकणारा होता. उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची एकत्र अंत्ययात्रा काढण्यात आली. पंचक्रोशीतील नागरिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
तीन कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडा
संकेत, साहिल आणि प्रणय जसे एकमेकांचे जिवलग मित्र होते तसेच त्यांच्या कुटुंबीयांतही सलोख्याचे संबंध होते. संकेत व साहिल आई-वडिलांना एकुलते एक होते. तर प्रणयला एक मोठा भाऊ आहे. आपली मुले शिक्षण घेऊन नोकरी - व्यवसाय करतील, कुटुंबाला आधार देतील, अशा स्वप्नांचा चुराडा झाला.
जिल्हा परिषद अध्यक्षांकडून सांत्वना
तीन मुलांचा मुरुमाच्या खाणीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती होताच जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी मंगळवारी अत्रे गाव गाठले. संकते, साहिल आणि प्रणय यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यावेळी कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले. यावेळी कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वानसही जिभकाटे यांनी दिले.