वाळू उत्खनन विरोधात सरपंचाचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:46+5:30
रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात गुन्हेगारीकडे ओढला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : तालुक्यातील वलनी (चौरास) येथील रेती घाटावरून अवैध वाळूचे उत्खनन धडाक्यात सुरु असल्याने गावातील मुलभूत सुविधांना बाधा पोहचत आहे. यासंदर्भात सरपंचानी प्रशासनाला निवेदन दिले. परंतु कार्यवाही न केल्यामुळे ६ नोव्हेंबर पासून उपोषणाचा मार्ग स्वीकारला अआहे. तहसील कार्यालयासमोर सरपंच व ग्राम पंचायत सदस्य आमरण उपोषणाला बसले आहेत.
रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात गुन्हेगारीकडे ओढला जात आहे. याप्रकाराला आळा घालण्यासाठी व अवैध रेती उत्खनन थांबविण्यासाठी कठोर कार्यवाही व्हावी म्हणून वलनी ग्राम पंचायतचे सरपंच दीपक तिघरे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदने दिले आहे.
मात्र यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही अधिकाऱ्यांनी केलेली नाही. त्यामुळे रेती तस्कर गावातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना तसेच गावकºयांना न जुमानता राजरोसपणे अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक करीत आहेत. रेती तस्करांना गावातील कोणी काही बोलल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे गावातील जबाबदार व्यक्ती म्हणुन सरपंच दीपक तिघरे, उपसरपंच धनवंता हटवार, सदस्य लक्ष्मी मेश्राम, योगिता तिघरे, किशोर मेश्राम, पुरुषोत्तम सेलोकर, विनायक गभने, शंकर मेश्राम, ग्रामस्थ के. टी. हटवार, माधव वंजारी, खेमराज तिघरे हे ६ नोव्हेंबर पासून उपोषणाला बसले आहेत.
मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले असून त्यात अवैध रेती उत्खनन त्वरीत थांबविण्यात यावे, वलनी घाटावर तत्काळ महसूल विभागाची चौकी लावण्यात यावी, पोलीस विभागाची गस्त वाढविण्यात यावी, रेती घाटाचा लिलाव लवकरात लवकर करण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश आहे.
वलनी घाटावर 30 ऑक्टोम्बर पासून चौकी लावालेली आहे. तलाठी, पोलीस पाटील कोतवाल यांना अवैध रेती उत्खननावर लक्ष ठेवून तात्काळ माहिती द्यावी असे निर्देश दिले आहेत. घाटावरुन अवैध रेती उत्खनन होतांना आढळून आलेले नाही.
-गजानन कोकुर्डे, तहसीलदार, पवनी.