आंबेडकरी विचार संमेलन आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:56 PM2017-11-04T23:56:22+5:302017-11-04T23:56:45+5:30
शोषित, उत्थानाच्या, आरक्षणाच्या आर्थिक विकासाच्या संधीच्या, बौद्ध विवाह कायद्याच्या निर्मितीच्या, बौद्ध संस्कृती संवर्धनाच्या व सामाजिक शोषणाच्या गंभीर प्रश्नांनी उच्छाद मांडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शोषित, उत्थानाच्या, आरक्षणाच्या आर्थिक विकासाच्या संधीच्या, बौद्ध विवाह कायद्याच्या निर्मितीच्या, बौद्ध संस्कृती संवर्धनाच्या व सामाजिक शोषणाच्या गंभीर प्रश्नांनी उच्छाद मांडला आहे. या प्रश्नाविषयी आंबेडकरी तत्त्वप्रकाशात विचारमंथन घडून यावे यासाठी आंबेडकरी विचार जागृती समितीच्या वतीने भंडारा येथे रविवारला (दि.५ नोव्हेंबर) लक्ष्मी सभागृहात राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होईल. अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे राहतील. अध्यक्षस्थानी राज्य अनुसूचित जातीजमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल. थुल हे राहतील.
दुपारी १.३० वाजता पहिल्या सत्रात आरक्षणाचा प्रश्न, बौद्ध व मागासवर्गीयांच्या सवलती आणि जात प्रमाणपत्रासंबंधीच्या समस्या या विषयावर नाशिकचे माजी न्यायाधीश अनिल वैद्य मार्गदर्शन करतील. दुपारी २.३० वाजता दुसºया सत्रात बौद्ध विवाह व वारस हक्क कायद्याची अपरिहार्यता या विषयावर माजी मंत्री डॉ.नितीन राऊत तर दुपारी ३.३० वाजता तिसºया सत्रात बौद्ध संस्कृती संवर्धनाचा प्रश्न या विषयावर प्रवास व पर्यटन विभागाचे संचालक तथा पुरातत्व विभागाचे प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होणार असून अतिथी म्हणून पुणे येथील माजी न्यायाधीश बी.जी. कोळसेपाटील व अतिथी म्हणून साहित्यिक व समीक्षक डॉ.अनिल नितनवरे राहतील. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डी.एफ. कोचे, निमंत्रक अमृत बन्सोड, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेश्राम, संघटन सचिव रूपचंद रामटेके, कोषाध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी केले आहे.