आंबेडकरांचे विचार मानवाला प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:44+5:302021-04-19T04:32:44+5:30
बोंडगावदेवी : समस्त मानवाला सन्मानाने जगता यावे, कोणीही आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये, महिलांना वंचितांना समाजामध्ये मानसन्मान मिळावा यासाठी ...
बोंडगावदेवी : समस्त मानवाला सन्मानाने जगता यावे, कोणीही आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये, महिलांना वंचितांना समाजामध्ये मानसन्मान मिळावा यासाठी अपार कष्ट करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवसंजीवनी दिली. त्यांचे विचार आजही मानवी समूहाला प्रेरणादायी ठरणारे असल्याचे प्रतिपादन चान्ना-बाक्टी येथील मिलिंद विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजन बोरकर यांनी केले.
मिलिंद विद्यालयात आयोजित डॉ. आंबेडकर जयंतीदिनी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गिरीश बोरकर, जयेश भोवते, मिलिंद रामटेके, प्रा. तारक माटे, प्रा. मंगेश दोनोडे, लोकमत प्रतिनिधी अमरचंद ठवरे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. प्राचार्य राजन बोरकर म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी घटना लिहून देशातील विविध जाती-पंथांच्या लोकांना एकसंध ठेवले. अखेरच्या क्षणापर्यंत पुस्तकप्रेमी असणारे डॉ. आंबेडकर यांनी देशातील शोषित, पीडित, बहुजन समाजाला मूलभूत अधिकार संपादित करून सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करून दिली. जीवनात पराकोटीचे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवावे, असे त्यांनी सांगितले.