रुग्णवाहिका चालकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:55 AM2019-03-08T00:55:03+5:302019-03-08T00:56:47+5:30
२४ तास इमानेइतबारे सेवा देवूनही रुग्णवाहिका चालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अनेकदा निवेदने व मागणी करुनही न्याय न मिळालेल्या रुग्णवाहिका चालकांनी गुरुवारी आंदोलनाचा मार्ग पत्करला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : २४ तास इमानेइतबारे सेवा देवूनही रुग्णवाहिका चालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अनेकदा निवेदने व मागणी करुनही न्याय न मिळालेल्या रुग्णवाहिका चालकांनी गुरुवारी आंदोलनाचा मार्ग पत्करला. सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात शासकीय रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेवरमोर्चा काढला.
आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य उपकेंद्रात रुग्णांना पोहचविण्याचे कार्य रुगणवाहिका चालक सातत्याने करीत आहेत. कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या या रुग्णवाहिका चालकांना प्रतिमाह ८ हजार ४०० रुपये मानधन दिले जात आहे. तुटपूंजे मानधनावर उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यातच वेळेवर व नियमित वेतन मिळत नसल्याने त्यांची प्रचंड कुचंबना होत आहे.
वारंवार शासन प्रशासनाला कळवूनही चालकांच्या समस्याला वाचा फुटलेली नाही. चालक महाराष्टÑ राज्यात रुग्णांना सेवा देत असताना कंत्राटदार मात्र मध्यप्रदेशातील नेमण्यात आला. वरिष्ठ अधिकारी मजेत असताना रुग्णवाहिका चालकांची अल्पशा मानधनामुळे फरफट होत आहे. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील जवळपास ४५ रुग्णवाहिका चालकांनी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. यावेळी परमानंद मेश्राम यांनी वाहनचालकांसह आरोग्य सेविकांवर होणाºया अन्यायाचा पाढा वाचला. शासन समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र जगताप यांनी निवेदन स्विकारावे अशी आंदोलकांची मागणी होती. मात्र ते उपलब्ध नसल्याने दुसºया सक्षम अधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारण्याचे सौजन्य यावेळी दाखविले नाही. परिणामी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलकांनी पोलीस उपनिरीक्षक गेडाम यांना निवेदन देवून शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोंगरे, आशिष लांजेवार, महेंद्र मेश्राम, अविनाश फुले, योगेश कारेमोरे, अमोल बरडे, गणेश भरारे, नितीन राऊत, मदन बुराडे, गौरीशंकर गिºहेपुंजे यासह अन्य वाहन चालकांचा समावेश होता. या आंदोलनाला महाराष्टÑ राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने पाठींबा दिला होता. यावेळी संघटनेचे उपमहासचिव सुर्यभान हुमणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, हरिशचंद्र धांडेकर, सिध्दार्थ भोवते आदी उपस्थित होते.
कित्येक वर्षांपासून रुग्णवाहिका चालकांवर सातत्याने अन्याय होत आहे. शासन व प्रशासनातील अधिकारी यांच्या समस्या सोडवायला कानाडोळा करीत आहेत. गोरगरीबांचा हक्क हिरावला जात असून या अन्यायाला आम्ही कदापी खपवून घेणार नाही. सदर रुग्णवाहिका चालकांच्या समस्या सुटेपर्यंत लढत राहू.
- परमानंद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता भंडारा