अपुऱ्या मानधनावर राबतात रुग्णवाहिका चालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 09:47 PM2018-07-27T21:47:39+5:302018-07-27T21:48:34+5:30

उन्ह, वारा, पाऊस असो की वैयक्तिक अडचण. कॉल आला की सुसाट वेगाने निघायचे. रात्री-बेरात्री गरोदर माता, आजारी बालकांना रुग्णालयात पोहचवायचे. त्यांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून वेळप्रसंगी जीवाची बाजी लावायची.

The ambulance driver runs on the poor standard | अपुऱ्या मानधनावर राबतात रुग्णवाहिका चालक

अपुऱ्या मानधनावर राबतात रुग्णवाहिका चालक

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियान : रुग्णांना जीवदान देणारे भविष्याच्या शोधात, आठ हजार रुपये महिन्यात कुटुंब चालविणे कठीण
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उन्ह, वारा, पाऊस असो की वैयक्तिक अडचण. कॉल आला की सुसाट वेगाने निघायचे. रात्री-बेरात्री गरोदर माता, आजारी बालकांना रुग्णालयात पोहचवायचे. त्यांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून वेळप्रसंगी जीवाची बाजी लावायची. असा नित्याचा दिनक्रम असलेले रुग्णवाहिका चालक मात्र भविष्याच्या शोधात आहेत. १३ वर्षापासून अवघ्या आठ हजार रुपये मासिक मानधनावर राबतात. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या १०२ रुग्णवाहिका चालकांची व्यथा ना शासना समजली ना प्रशासनाला.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातून कोवळी पानगळ रोखण्यासाठी गरोदर माता आणि नवजात बालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. भंडारा जिल्ह्यात मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी २००५ पासून १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा दिली जाते. या अंतर्गत गरोदर माता आणि शून्य ते एक वयोगटातील बालकांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयासाठी रुग्णवाहिका देण्यात आली आहे.
१०२ क्रमांकावर कॉल आली की चालक रुग्णापर्यंत पोहचून त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करातात. जिल्ह्यात असे सुमारे ५० रुग्णवाहिका चालक अहोरात्र सेवा देत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेले हे रोजंदारी चालक मात्र अपुऱ्या मानधनावर राबत आहेत.
२००५ मध्ये ही सुविधा सुरू झाली तेव्हा या चालकांना केवळ २६५० रुपये मानधन मिळत होते. आता कुठे त्यांना दरमहा आठ हजार मानधन दिले जाते. मुलांचे शिक्षण, लग्न, औषधोपचार आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अनेक चालक सर्वसामान्य परिवारातील आहेत. अनेकांकडे स्वत:चे घर नाही. घरभाड्यात अर्धे मानधन जाते.
महागाईच्या काळात आठ हजार एकाट्यालाच कमी पडतात, तेथे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न आहे. या सोबतच चालकांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. साधा अपघात विमाही काढण्यात आला नाही. अशा एक ना अनेक समस्यांशी झुंज देत ही मंडळी रुग्णाच्या जीवासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावतात.
आपल्यावरील अन्याय दूर व्हावा, मानधनात वाढ व्हावी, यासाठी चालकांनी वेळोवेळी शासन, प्रशासनाचे उंबरठे झिजविले. राष्ट्रपतीपासून जिल्हा प्रशासनापर्यंत निवेदने दिली. मात्र त्यांच्या समस्यांची कुणी दखलच घेतली नाही.
चालक जितेंद्र डोंगरे यांनी तर राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे ईच्छा मरणाची गत वर्षी परवानगी मागितली होती. त्यावरून राष्ट्रपती कार्यालयातून येथील जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाला पत्र प्राप्त झाले होते. त्या पत्रात संबंधित कर्मचाºयांचे ेप्रश्न मार्गी लावण्याचे सुचविले होते.
परंतु कोणतीच कारवाई झाली नाही. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसमोर उपोषणही करण्यात आले. समस्या मात्र सुटल्या नाही. आजही हे रोजंदारी चालक आठ हजार रुपये मानधनावर २४ तास सेवा देत आहेत.
अशा आहेत रुग्णवाहिका चालकांच्या मागण्या
‘रोजंदारी काम भासल्यास’ या शब्दाला वगळण्यात यावे, एनएचप्रमाणे ११ महिन्याचे आदेश द्यावे.
दरमहा २० हजार रुपये मानधन देण्यात यावे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात सदनिका तयार करून चालकांना राहण्याची सुविधा द्यावी.
चालकांचा पीएफ आणि अपघात विमा काढण्यात यावा.
वाहन चालकांची कंत्राटी भरती पद्धत बंदी करावी.
४० रुपये तासाप्रमाणे अतिरिक्त भत्ता देण्यात यावा.
स्वातंत्र्यदिनी वैनगंगेत उडी घेण्याचा इशारा
रुग्णवाहिका चालकांच्या मानधनाचा प्रश्न सुटला नाही तर वैनगंगा नदीत स्वातंत्र्यदिनी उडी घेण्याचा इशारा शासकीय रुग्णवाहिका रोजंदारी वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांर्भियाने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.

Web Title: The ambulance driver runs on the poor standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.