रुग्णवाहिका चालकांचा संघर्ष थांबता थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 09:42 PM2019-03-05T21:42:17+5:302019-03-05T21:42:37+5:30
रुग्णांच्या सेवेसाठी रात्री बेरात्री धावून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकांच्या जीवनातील संघर्ष संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत. आरोग्य विभागात कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या जिल्हाभरातील ४५ रुग्णवाहिका चालक अल्पशा मानधनावर कार्यरत असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रुग्णांच्या सेवेसाठी रात्री बेरात्री धावून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकांच्या जीवनातील संघर्ष संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत. आरोग्य विभागात कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या जिल्हाभरातील ४५ रुग्णवाहिका चालक अल्पशा मानधनावर कार्यरत असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
आरोग्य विभागांतर्गत जिल्हाभरातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयातील जवळपास ४५ रुग्णवाहिका चालक आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत या वाहन चालकांच्या समस्या मागील दशकभरापासून जैसे थे आहेत. विद्यमान स्थितीत या रुग्णवाहिका चालकांना प्रतीमाह ८ हजार ८०४ रुपये मानधन दिले जाते. मात्र शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे या रुग्णवाहिका चालकांना १४ हजार ९०० रुपयांचे मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र या मागणीला खो देण्यात येत आहे.
दरम्यान या रुग्णवाहिका चालकांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी ८ मार्च रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. आता या रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशा आहेत प्रमुख समस्या
वाहनचालक अजूनही कंत्राटी पद्धतीवर कार्य करीत आहेत. अन्य राज्यातील रुग्णवाहिका चालकांना चांगले मानधन मिळत असताना राज्यातील विशेषत: पूर्व विदर्भातील रुग्ण वाहिका चालकांचे मानधन अत्यल्प आहे. अशा स्थितीत प्रपंच चालविणे जिकरीचे झाले आहे. परिणामी राज्य स्तरावरील बाह्यस्त्रोत वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट बंद करून ठेकेदारी पद्धती बंद करावी, मंजूर पदांतर्गत विनाअट व शर्तीने वाहनचालकांचे समायोजन करावे, दरमहा १५ हजार रुपये मानधन देऊन शासकीय निवासाची व्यवस्था करून देण्यात यावी आदी प्रमुख मागण्या आहेत.