कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:15+5:302021-05-09T04:37:15+5:30

भंडारा : बदलत्या आधुनिक जीवनशैलीत मानवाला विविध आजारांनी ग्रासले आहे. यात प्राचीन उपचार पद्धतीत व आजच्या काळात प्रासंगिक ठरलेल्या ...

The amount of pranayama on the corona | कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा

कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा

Next

भंडारा : बदलत्या आधुनिक जीवनशैलीत मानवाला विविध आजारांनी ग्रासले आहे. यात प्राचीन उपचार पद्धतीत व आजच्या काळात प्रासंगिक ठरलेल्या योगा व प्राणायामाची मात्रा मात्र सर्वच रोगांवर रामबाण उपाय ठरली आहे. कोरोनाच्या लढ्यातही प्राणायामाची मात्रा यशस्वी ठरली आहे. तज्ज्ञही प्राणायाम योग्य व सुव्यस्थितपणे केल्यास त्याचा फायदा आपल्या फुप्फुसांना होऊन सुदृढ व आरोग्यमय जीवन जगू शकतो, असे सांगत आहेत.

कोरोना महामारीत जेव्हा सगळ्यांनाच चिंता भासली अशा स्थितीत अनेकांनी विविध उपचार पद्धती अवलंबली. मात्र, अनेकांना वेळप्रसंगी बेडही मिळाले नाही. ऑक्सिजनअभावी अनेकांना जीवही गमवावे लागले. मास्क लावणे, सॅनिटायझरचा उपयोग, वारंवार हात धुणे व रोगप्रतिकारशक्ती वाढविणे यावर सगळे भर देतात; पण बहुतेक लोकांचे दुर्लक्ष एका गोष्टीकडे होते. ते म्हणजे आपले फुप्फुसे कसे मजबूत व कसे निरोगी ठेवता येईल. कोरोना हा विषाणू मुख किंवा नाकाद्वारे शरीरात प्रवेश करून रक्ताच्या बारीक गाठी तयार करतो व जिथे प्राणवायू व कार्बन डायऑक्साइडचे देवाण- घेवाण होते तिथे आपले निगेटिव्ह कार्य करतो.

नियमित प्राणायाम केल्याचे फायदे

नियमित प्राणायाम केल्याने रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होते. प्राणायाम रोज करणे अत्यंत गरजेचे आहे. प्राणायामाने मानसिक संतुलनही बिघडत नाही.

शरीरिकदृष्ट्या मनुष्य सक्षम राहून कुठल्याही मोठ्या संकटाला धैर्याने सामोरे जाऊ शकतो. याशिवाय मानवी शरीराला जडणाऱ्या विविध आजारांपासूनही आपण दूर ठेवू शकतो.

विविध आसनांचे प्रकारही सातत्याने केले पाहिजे. जेणेकरून सृदृढ आरोग्य आपल्याला लाभू शकते.

प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात...

नियमितपणे प्राणायाम केल्यास मनुष्य निरोगी राहू शकतो. पर्यायाने फुप्फुसही निरोगी राहतील. यात तीन गोष्टी नियमित करायला हव्यात. फुप्फुसाला स्वच्छ ठेवणे, लवचिक ठेवणे व फुप्फुसातील प्राणवायू घेण्याची क्षमता वाढविणे होय. फुप्फुस हा स्वत: स्वच्छ राहणारा अवयव आहे. प्राणायामच्या माध्यमातून आपण त्याला अधिक सुदृढ करू शकतो. प्रदूषण, धूम्रपान किंवा इतर गोष्टींमुळे त्यामध्ये कफ जमा होऊ शकतो. त्यासाठी नियंत्रित खोकला काढणे व हफ्फिंग करणे आवश्यक आहे. सूर्यनमस्कार, भूजंगासन, सुखासन, मत्स्यासन, पद्मासर्वांगासन आदींमुळेही फुप्फुसे व छातीची मांसपेशी मजबूत होतात.

-डॉ. दिलेश वंजारी, फिजिओथेरेपिस्ट, भंडारा,

फुप्फुसातील प्राणवायू घेण्याची क्षमता आपण त्यामधील डेड स्पेस कमी करता व भरून काढू शकतो. यासाठी चार महत्त्वाचे भाग व्यायामातून करता येतात. यासाठी श्वसनक्रियेतील घटक महत्त्वाचे आहेत. यात डायफ्राम, व्यायाम तसेच पोट व फुप्फुसांमध्ये हवा घेणे, ब्रिदिंग टेक्निक ही पद्धती अवलंबित करावी.

-डाॅ. अमित कावळे, भंडारा.

नियमित योगा करणारे म्हणतात...

मी बऱ्याच वर्षांपासून नियमितपणे योगा व प्राणायाम करीत आहे. कंपनीत असतानाही मी कधीही हा अभ्यास सोडला नाही. म्हणून मला आज कुठलाही आजार नाही. कोरोना संघर्ष काळात अनेकांना ऑक्सिजनअभावी जीव सोडल्याचे ऐकले आहे. नागरिकांनी पर्यावरणाचा मान राखून त्याचे संरक्षण केले पाहिजे. वृक्ष ऑक्सिजन निर्मितीचे केंद्र आहे. नियमितपणे योग व प्राणायाम करून आपल्या शरीराला सृदृढ ठेवणे हे आपल्याच हाती आहे.

-मो. सईद शेख, भंडारा.

जीवनात अनेक चढ-उतार बघितले. मात्र, मानवी शरीरावरही अपायकारक कुठलीही बाब खपवून घेतली नाही. मनोबलात सातत्यपणा ठेवून नियमितपणे योग व प्राणायाम करीत असतो. शरीराला हवे असलेले ऑक्सिजन नियमितपणे देणे हे आपले प्रथम कार्य असले पाहिजे. लोम-विलोम यासह श्वसनाचे व्यायाम नियमितपणे केलेच पाहिजे. तरच आपल्या फुप्फुसाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळेल. जेणेकरून आपण अधिक सक्षम व बळकट राहू. मानसिक आरोग्यही उत्तम राहील.

- गिरीश उजवणे, साकोली.

Web Title: The amount of pranayama on the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.