रक्त वाहून नेणारे वातानुकुलीत वाहन राष्ट्रीय महामार्गावर जळून खाक
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: May 26, 2024 06:31 PM2024-05-26T18:31:35+5:302024-05-26T18:32:26+5:30
वाहनचालक सुरक्षित : मध्यरात्रीपर्यंत वाहतूक दुतर्फा ठप्प
भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर शुक्रवारी रात्री १०:३० वाजताच्या दरम्यान रक्त वाहून नेणाऱ्या वातानुकुलीत वाहनाला अचानक आग लागली. काही वेळातच वाहनाला पूर्णत: आग लागून जळून खाक झाले. ही घटना महामार्गवरील राजेगाव एमआयडीसी फाट्याजवळ घडली. यामुळे मध्यरात्रीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने कसलीही प्राणहानी झाली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन नागपुरातील लाईफ लाईन ब्लड बँकेचे असून त्याचा क्रमांक केए ५० / बी २६०९ असा आहे. अशोक लेलँड कंपनीचे हे वाहन जवळपास ४५ रक्ताच्या पिशवीो बॉक्स घेऊन नागपूरहून रात्री ९ वाजताच्या सुमारास रायपूरला जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, रात्री १०:३० वाजताच्या सुमारास राजेगाव एमआयडीसी फाट्यावरून जाताना या वाहनाच्या मागून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे वाहन थांबवून तो खाली उतरला. एवढ्यात वाहनाने अचानकपणे पेट घेतला. वाहन संपूर्ण वातानुकूलित असल्यामुळे वेगाने हे वाहन पेटून जळून खाक झाले.
ऐन महामार्गवर घडलेल्या या प्रकारामुळे मार्गवरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी आणि नागिरकांनी पोलिसांना कळवून भंडारा व लाखनी अग्निशामक दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्नीशामक दलाच्या वाहनांनी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत वाहन पूर्णत: आगत स्वाहा झाले होते. त्यातील रक्ताच्या बॅगचे काही बॉक्स वाचविण्यात यश आले असले तरी बहुतांश बॉक्स आगीत जळाले.
२० ते २२ लाखाचे नुकसान
लाखनी पोलिसांच्या मते, हे वाहन वातानुकूलित असल्याने आतील एयर कंडीशनरने पेट घेतला असावा. त्यामुळे वेगाने आग पसरून वाहन जळाले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. या वाहनासोबत चालकासह वाहन मालकही होते. मात्र स्टेशन डायरीवर घटना नोंद न झाल्यामुळे दोघांचीही नावे कळू शकली नाही. यात साधारणत: २० ते २२ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज रात्री कर्तव्यावर असलेले हवालदार रामटेके यांनी व्यक्त केला आहे.