बापरे... आनंदाचा शिधा किटमधील रखा निकृष्ट दर्जाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:23 AM2024-10-10T11:23:52+5:302024-10-10T11:24:46+5:30
किटाडीत प्रकार : दुर्गंधीयुक्त रव्यात आढळल्या अळ्या व बारीक किडे
लोकमत न्यूज नेटवर्क
किटाडी : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सण, उत्सवानिमित्त गरीब लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा किट वाटप केली जात आहे. या किटमधून उत्कृष्ट दर्जाच्या चार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी लाखनी तालुक्यातील किटाडी येथील रेशन दुकानातून मिळणाऱ्या आनंदाचा शिधा किटमधील रवा काळसर रंगाचा व दुर्गंधीयुक्त असून, ख्यात बारीक किडे व अळ्या आढळल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे.
राज्य सरकारकडून नवरात्रोत्सवात आनंदाचा शिधा प्राप्त झाला. किटाडी येथे रेशन दुकानातून सोमवारी आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात करण्यात आली. शिध्यात एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणा डाळ व एक किलो गोडेतेल आदींचा समावेश आहे. हे चारही साहित्य १०० रुपयांच्या मोबदल्यात वाटप केले जात आहेत. किटाडी येथे ५६४ रेशनकार्डधारक लाभार्थी असून, सोमवारी सकाळ पाळीत ८३ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यामध्ये मिळणारा रवा निकृष्ट दर्जाचा आहे. आरोग्यासाठी पोषक नसल्याचे दिसून आले. परिणामी, लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांनी केला पंचनामा
किटाडी येथील रेशन वितरक विवेक घाटबांधे हे आनंदाचा शिधा किट वितरण करीत असताना किटमधील रवा निकृष्ट दर्जाचा असल्याची माहिती लाभार्थ्यांकडून मिळताच पुरवठा विभागाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. यावरून पुरवठा विभागाचे अधिकारी विनय कछवाह यांनी किटाडी येथील रेशन दुकानाला भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच कल्पेश कुळमते, उपसरपंच पंकज घाटबांधे, पोलिस पाटील प्रशांत धुर्वे, तंमुस अध्यक्ष देविदास शेंडे आदी उपस्थित होते.
"आनंदाचा शिधा किटमधील निकृष्ट दर्जाचा असलेला रवा बदलून पुरवठा विभागाकडून त्या बदल्यात नव्याने पुन्हा चांगल्या दर्जाचा रवा लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल."
- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी लाखनी
"स्वस्त धान्य दुकानातून मिळालेल्या किटमधील व्याच्या पाकिटमध्ये बारीक-बारीक किडे, अळ्ळ्या आढळून आल्या. रवा काळसर रंगाचा आहे. त्या व्याला दुर्गंधीसुद्धा येत होती."
-कुंदा वरवाडे, लाभार्थी महिला, किटाडी
"शिधा किट वाटपाला सोमवारी सुरुवात केली. ८३ लाभार्थ्यांना शिधा किट वाटप करण्यात आली. मात्र, लाभार्थ्यांना रवा हा निकृष्ट असल्याची माझ्याकडे तक्रार केली. सद्यस्थितीत आनंदाचा शिधा किट वाटप बंद करण्यात आले आहे."
- विवेक घाटबांधे, राशन वितरक, किटाडी.