प्राचीन बौद्ध स्तुपाचा शासनाला विसर

By admin | Published: May 15, 2017 12:29 AM2017-05-15T00:29:24+5:302017-05-15T00:29:24+5:30

हजारो वर्षापूर्वी ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगरी ही बौद्ध धर्माच्या प्रसाराने दक्षिण भारताचे मुख्य केंद्र होती.

The ancient Buddhist worshiper has forgotten the government | प्राचीन बौद्ध स्तुपाचा शासनाला विसर

प्राचीन बौद्ध स्तुपाचा शासनाला विसर

Next

जगन्नाथ टेकडीवरील स्तुप : पवनीतील पर्यटन
पवनी : हजारो वर्षापूर्वी ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगरी ही बौद्ध धर्माच्या प्रसाराने दक्षिण भारताचे मुख्य केंद्र होती. जगन्नाथ टेकडी, चंडकापूर टेकडी व हरदोलाला टेकडी येथील उत्खननात सापडलेल्या प्राचीन बौद्ध स्तुपांमुळे हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. या प्राचीन बौद्ध स्तुपांचा विकास झालेला नाही.
या बौद्ध स्तुपांचा विकास जागतिक दर्जाच्या या प्राचीन बौद्ध स्तुपांची पुरातत्व विभाग, पर्यटन विभागाने विकास केल्यास पवनी शहर हे आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटनस्थळाच्या नकाशावर येवून जागतिक स्तरावर प्रसिद्धीला यायला वेळ लागणार नाही. पण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे या प्राचीन बौद्ध स्तुपांचा विकास झालेला नाही.
ऐतिहासिक प्राचीन पवनी नगरी व सम्राट अशोक यांचा निकटचा संबंध आहे. हजारो वर्षापूर्वी सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माच्या प्रचार व प्रसाराकरिता भारतात ८४ हजार स्तुपांची निर्मिती केली. त्यापैकी एक मोठा स्तुप जगन्नाथ टेकडीच्या खाली, नागपूर विद्यापीठ व भारतीय पुरातत्व विभागाने १९६८-७० मध्ये केलेल्या उत्खननात सापडला. हा स्तुप सांची व भरहूत येथील स्तुपांपेक्षा आकाराने मोठा व या स्तुपांपेक्षा प्राचीन आहे. पवनी हे विदर्भ क्षेत्रातील हिनयान बौद्ध धर्माचे प्रसिद्ध केंद्र, त्याकाळी असल्याचे मानले जाते. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील कान्हेरी, अजंठा येथील गुफांच्या रुपात बुद्ध धर्माचा प्रभाव असल्याचे मानले जात होते. पण पवनी परिसरातील सापडलेल्या बौद्ध स्तुपांमुळे पूर्व महाराष्ट्रातही बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याचे समजते.
जगन्नाथ टेकडीवरील बौद्ध स्तुप भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तिसऱ्या शतकात अशोकाच्या पूर्वकाळात निर्माण केल्याचे मानले जाते. शुगाच्या काळात स्तुप वाढवीला. दगड लावून चारही दिशांनी प्रवेश द्वार लावण्यात आले. या स्तुपाचा व्यास ३८.२० मिटर होता. स्तुपाच्या निर्मितीकरिता ४० बाय ३७ बाय १० सेंमी आकाराच्या विटा लावण्यात आल्या होत्या. जगन्नाथ स्तुपाच्या आतील व बाहेरील वेदीकांशी जुळलेली शिल्पकला ही भरहूत परंपरा दर्शविते. येथे केशभुषा व अंगावरील दागिन्यांचे सुक्ष्म चित्रण करण्यात आले. पुष्प चिन्हाच्या कलाकृती अनेक ठिकाणी विविध रुपात नक्षीकाम केल्याचे सापडलेल्या अवशेषांवरून कळते. ही पवनीची विशेषता आहे. खननात मिळालेल्या अवशेषांमध्ये यक्षमूर्ती एक तुटलेल्या अवस्थेत आहे व दुसरी स्वरमुख यक्षाची आहे. एका मूर्तीमध्ये राजा अजातशत्रू सन्मानपूर्वक बुद्धांच्या अस्थी सन्मानपूर्वक नेत असल्याची आहे. या मध्ये काही सिरी सातकर्णी चे तांब्याचे नाणे मिळाले आहेत. त्यामुळे प्रदेशातील नाण्यांची माहिती होण्याला मदत होते. उभ्या म हिलेच्या टेरॅकोटा बांगडीवरील तयार करण्यात आलेली आकृती ही येथील विशेषत: आहे. छत्रावलीच्या दगडांचे छत्रीचे तुकडे मिळाले. मूर्ती, वस्तू, शिल्प आजही मुंबई, दिल्ली, गया आदी शहरातील प्राचीन वस्तू संग्रहालयात ठेवल्या आहेत. वस्तू पवनीच्या प्राचीनतेची साक्ष देत आहेत.

पवनी येथे वस्तू संग्राहालय व्हावे
पवनीच्या प्राचीनतेची ओळख करून देणाऱ्या प्राचीन वस्तू, शिलालेख देशाच्या अनेक शहरात आहेत. या सर्व वस्तू येथे आणून व येथील मूर्ती शिल्प व वस्तूंचे संग्राहालय बनविण्याची गरज आहे. त्यामुळे पवनीची एक वेगळीच ओळख निर्माण होईल. अजूनही शहरामध्ये प्राचीन, ऐतिहासीक वस्तू सापडतात. अशाच प्रकारचे एक कोरीव शिल्प ईश्वर रामटेके यांना अनेक वर्षापूर्वी सापडले. यात दोन बाजूला कोरीव मूर्ती, एका बाजूला बुद्धांची मूर्ती व चवथ्या बाजूला पाकड्यांचे फुल आहे.

Web Title: The ancient Buddhist worshiper has forgotten the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.