किल्ला सौंदर्यीकरणाच्या खोदकामात सापडले प्राचीन लोखंडी चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:40 AM2022-02-14T10:40:23+5:302022-02-14T12:34:19+5:30

सम्राट अशोक पूर्वकालीन जनपद असलेले तत्कालीन विकसित शहर म्हणून पवनी नगराची ख्याती आहे.

Ancient iron wheel found in fort beautification excavations in pauni bhandara | किल्ला सौंदर्यीकरणाच्या खोदकामात सापडले प्राचीन लोखंडी चाक

किल्ला सौंदर्यीकरणाच्या खोदकामात सापडले प्राचीन लोखंडी चाक

Next
ठळक मुद्देब्रिटिशकालीन असल्याचा कयास पुरातत्त्व विभाग अजूनही अनभिज्ञ

अशोक पारधी

पवनी (भंडारा) : निलज - कारधा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाेबतच पवनी येथील किल्ल्याच्या मातीच्या भिंतीवर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान खोदकामात बारा आरे असलेले लोखंडी चाक सापडले. आधी हे चाक गायब करण्याच्या मनस्थितीत असताना याची चर्चा गावभर झाली. याबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहणी केल्यानंतर पुरातत्त्व संशोधन व संरक्षण समितीला याबाबत अवगत करून दिले. उल्लेखनीय म्हणजे हे चाक आताही बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या ताब्यात आहे.

सम्राट अशोक पूर्वकालीन जनपद असलेले तत्कालीन विकसित शहर म्हणून पवनी नगराची ख्याती आहे. पवनी नगराच्या सभोवताली संरक्षणासाठी दगड, माती व विटांची भक्कम अशी इंग्रजी ‘यू’ आकाराची तटबंदी बांधलेली आहे. खोदकामादरम्यान एक बारा आरे असलेले लोखंडी चाक सापडले. हे चाक ठेकेदाराने अधिक वाच्यता न करता आपल्या चुऱ्हाड येथील कॅम्पवर रातोरात हलविले. दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. सामाजिक कार्यकर्ते ही पुरातन वस्तू पाहण्यासाठी चुऱ्हाड या गावाकडे वळले. कोणी ‘अशोकचक्र,’ तर कुणी हे रथाचे चाक, तर कुणी तोफ वाहून नेणाऱ्या गाडीचे चाक असल्याचे मत व्यक्त केले.

प्रत्यक्षात गुगलवर या लोखंडी चाकाची माहिती शोधली असता हे चाक आतून व बाहेरून प्रत्येकी सहा आऱ्यांचे असे एकूण बारा आऱ्यांचे पुरातन लोखंडी चाक असून, हे संभवतः १८ व्या शतकातील मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मालवाहू वाहनांचे चाक असावे, असा कयास व्यक्त केला.

पुरातत्त्व विभाग अनभिज्ञ

पवनीनगर हे पुरातन, मोठ्या लोकसंख्येचे तत्कालीन विकसित नगर असल्यामुळे या नगरीवर पेंढाऱ्यांनी लुटीसाठी बऱ्याचदा आक्रमणे केली. ब्रिटिशांनी आक्रमण करून पवनी काबीज केली. ब्रिटिशांनी युद्धाच्या वेळी तोफ वाहून नेणाऱ्या वाहनाचे चाक असावे, असे वाटते. या बाबीकडे मात्र पुरातत्त्व विभाग अनभिज्ञ आहे. पुरातत्त्व विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन लोखंडी चाकाची तपासणी करावी, अशी मागणी पुरातत्त्व संशोधन व संरक्षण समितीचे अध्यक्ष ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी केली आहे.

लोखंडी चाक १९ व्या शतकातील ब्रिटिशकालीन आहे. तोफगाडी किंवा जड वस्तू वाहून नेण्यासाठी वापरत असलेल्या गाडीचे हे चाक असावे.

-डॉ. संजय पाईकराव, अतिथी प्राध्यापक, इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभाग, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

Web Title: Ancient iron wheel found in fort beautification excavations in pauni bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.