अनास्थेच्या चक्रव्यूहात प्राचीन वारसा; सातबारा सरकारच्या नावे, पुरातत्त्व विभागात मात्र नाेंदच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 04:48 PM2022-04-22T16:48:28+5:302022-04-22T16:53:53+5:30
पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याची नाेंदच नाही. त्यामुळे येथे काेणतीही सुरक्षा व्यवस्था नाही.
संजय साठवणे
साकाेली (भंडारा) : महसूल दप्तरी सातबारावर सरकारचे नाव आहे, मात्र पुरातत्त्व विभागात साधी नाेंदही नाही अशा अनास्थेच्या चक्रव्यूहात साकाेली तालुक्यातील भाेसलेकालीन किल्ला अडकला आहे. पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या किल्ल्यावर सध्या झाडेझुडपे वाढली असून येथील दृश्य इतिहासप्रेमींना व्यथित करणारे आहे.
साकाेली तालुक्यात भाेसलेकालीन सहानगड म्हणजे आजचे ऐतिहासिक वारसा सांगणारे सानगडी गाव. दाेन हेक्टर ४३ आर हेक्टर जागेत नागपूरच्या रघुजी राजे भाेसले यांनी हा किल्ला १७३४ मध्ये बांधला. किल्ला, बाहुडी, प्रवेशद्वार यासह इतिहासाच्या साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू या परिसरात विखुरलेल्या आहेत. पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याची मात्र आता दुरवस्था झाली आहे. सानगडीच्या किल्ल्यावर अष्टधातूची माेठी ताेफ आहे. या ताेफेची लांबी ११ फूट, घेर पाच फूट आणि पाच कडे आहेत. ताेफेच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. सानगडी परिसरात अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत. मात्र, या किल्ल्याच्या देखरेखीची काेणतीही सुविधा नाही.
या किल्ल्याची नाेंद महसूल दप्तरी सातबारावर सरकार म्हणून आहे. जमीन कसणाऱ्याचे नाव म्हणून सरकार असा उल्लेख केला असून झुडपी, जंगल असल्याचे या सातबारावर नमूद आहे. मात्र प्राचीन वैभव असलेला हा किल्ला अनास्थेचा विषय झाला आहे. पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याची नाेंदच नाही. त्यामुळे येथे काेणतीही सुरक्षा व्यवस्था नाही.
ग्रामपंचायतीचा सातत्याने पाठपुरावा
सानगडी ग्रामपंचायतीच्यावतीने या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पुरातत्त्व विभागासह पर्यटन विभाग, राज्यसरकार आणि लाेकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार केला. पुरातत्त्व विभागाने ही वास्तू राज्य संरक्षित नाही असे पत्र देऊन हात झटकले. परिणामी हा किल्ला उपेक्षित आहे.