अन् नववधू पोलीस ठाण्यात पोहोचली...!
By admin | Published: May 7, 2016 12:59 AM2016-05-07T00:59:49+5:302016-05-07T00:59:49+5:30
लग्न जुळल्यानंतर मुलगी भविष्याची स्वप्ने रंगवीत असते. घरातही आनंदमय वातावरण असते.
नवरदेव झाला बेपत्ता : मोहाडी पोलिसांना नवरदेव शोधण्याचे आव्हान
राजू बांते मोहाडी
लग्न जुळल्यानंतर मुलगी भविष्याची स्वप्ने रंगवीत असते. घरातही आनंदमय वातावरण असते. पण, आल्हाददायक क्षणात विरजन पडले की, मन सुन्न होते. अशीच घटना खरबी येथे घडली. वधू लग्नानंतर वरमंडप जाण्याचे सोडून पोलीस ठाण्यात पोहोचली.
खरबी येथील किसनाबाई आगाशे यांच्या घरी वरपक्षाकडून पाहुणे अन् नवरदेव विवाह घटीकेला न पोहोचल्याने नववधू व त्यांच्याकडील आप्तस्वकीयांनी मोहाडी पोलीस ठाणे गाठले. अनंदाबाई व सूर्यभान तितिरमारे रा.बोथली यांचा मुलगा कोमल याचा विवाह गोविंद आगाशे यांच्या मुलीशी ५ मे रोजी सकाळी ११.२५ वाजता विवाह ठरलेला होता. नवरदेव पत्रिका वाटायच्या निमित्ताने १ मे रोजी घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. सूर्यभान तितिरमारे यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी वडिलाने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार वरठी पोलीस ठाण्यात दाखल केली. मुलगा बेपत्ता असल्याची माहिती वधुपक्षाला कळविण्यात आली. लग्नवेळेपर्यंत मुलगा परत आल्यास लग्न लावले जाईल, अशी ग्वाही मुलाच्या वडिलाने वधुपक्षाला दिली. इकडे मुलीच्या वडिलाने लग्नाची तयारी केली होती. पण पुढे काय होणार याची चिंता सगळ्यांना होती. दोन घराण्यांचे ऋणानुबंध जोडणाऱ्या मंगलघटीकेपर्यंत नवरदेव खरबीत पोहचला नाही. नवरी भावविश्वाची स्वप्ने साकारत होती. पण, नियतीने दगा दिला. अन् संतापलेल्या आगाशे कुटुंबीयांनी मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुपारी दीड वाजता सजलेली नवरी व तिचे आप्त पोलीस ठाण्यात आले. वर पक्षाकडून मुलाचे वडील व त्यांचे नातेवाईकही ठाण्यात पोहोचले.
मुलगा परत आला की, लग्न लावायला तयार आहे. मी वरठी पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. अजून त्याचा शोध लागला नाही. मीसुध्दा चिंतीत आहे. माझा मुलगा हरवलाय याची मला काळजी वाटते. तुम्ही चिंता करु नका, अशी विनवणी त्यांनी वधुपक्षाला केली. सामोपचाराने पुढचा वाद निवळला. पण, पुढे काय होते असा प्रश्न दोन्ही पक्षांना सतावत आहे. तिकडे नवरदेवाच्या घरी मंडपच टाकण्यात आला नव्हता. त्याच्या आई-वडिलाला मुलाची चिंता सतावत आहे.
साक्षगंधाचाही कार्यक्रम टळला
लग्नापूर्वी साक्षगंध करण्याची हिंदू समाजात परंपरा आहे. साक्षगंधाचा कार्यक्रमात रितीप्रमाणे वधूपक्षाकडे मंडपाच्या दिवशी होता. पंरतु नवरा मुलगाच बेपत्ता असल्याने साक्षगंधचाही मुहूर्तही टळला. विवाह मुहूर्त टळला, पण लग्न तुमच्याच मुलाशी होणार हा शब्द वरपक्षाने दिला आहे.
मुलगा राज्य परिवहन विभागात नोकरीला आहे. लग्नाच्या त्याने सुट्या घेतलेल्या आहेत. मुलाच्या वडीलाने वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एक आठवडा होऊन मुलाचा शोध घेतला नाही. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण केले जात आहे.
एक मात्र, विवाह मुहूर्त टळला,पण लग्न तर त्याच मुलाशी होणार हा शब्द वर पक्षाने दिला त्यामुळे पोलिसांच्या कारवाया थांबल्या आहेत. मुलगा पळण्याची कारणे मुलगा आल्याशिवाय कळणार नाहीत.