अन् मुलाच्या नोकरीची इच्छा राहिली अपुरी
By admin | Published: June 18, 2017 12:22 AM2017-06-18T00:22:46+5:302017-06-18T00:22:46+5:30
सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची ...
प्रकरण जांभोरा येथील शेतकरी आत्मदहनाचे
युवराज गोमासे । लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची वेदनादायक तितकीच दुदैवी घटना १६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ताराचंद यांचा एकुलता मुलगा मुलचंद हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी असून बेरोजगारीमुळे रोहयो कामावर जातो. शासनाचे वतीने अंशकालीन कर्मचाऱ्यांचे डाटा बेस करण्यात आल्याने मुलाला नोकरी लागून चांगले दिवस येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ताराचंदचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक ताराचंद शेंदरे यांची अडीच एकर शेती जांभोरा शेतशिवारात एकलकाझरी परिसरात आहे. मागील वर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती रोवणी अभावी पडित राहिल्या. शेती कसण्यासाठी त्यांनी नातेवाईक व अन्य लोकांकडून त्यांनी पैसे उसनवार मागितले होते.
वारंवारच्या नापिकीमुळे तो त्रस्त होता. निसर्ग जगू देत नाही, अन मरू देत नाही, अशी त्याची अवस्था होती. घटनेच्या दिवसी तो रोजच्या प्रमाणे घरून निघून गेला.
परंतू सायंकाळ होवूनही घरी न परतल्याने मुलाने शोध केली असता वडिलाचे मृत शरीर तणसाच्या ढिगाऱ्यात जाळल्याचे अवस्थेत मिळून आला. घटनेच्या माहिती त्याने सरपंच व ग्रामस्थ व नातेवाईकांना दिली.
मुलांनी फोडला हंबरडा
शवविच्छेदनासाठी ताराचंद यांचा मृतदेह भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारी पार्थिव घरी पोहचताच जमलेल्या नातेवाईकांनी, मुलांनी फोडला हंबरडा. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या. सर्वांनी साश्रूपूर्ण नयनांनी ताराचंदला जांभोरा येथील सागर तलाव स्मशानभूमित अखरेचा निरोप दिला. शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मात्र शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
एकही अधिकारी व पदाधिकारी अंत्ययात्रेकडे फिरकला नाही. त्यामुळे गावकऱ्यांत तीव्र नाराजीचा सूर आहे. अंत्ययात्रेला सरपंच भुपेंद्र पवनकर, सुरेश बिसने, ग्रामपंचायत सदस्य राजघर शेंडे, संजय शहारे व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफिची तत्काळ अंमलबजावणी करावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. कर्जमाफीचे निकष शेतकऱ्यांसाठी कर्दणकाळ ठरणारे आहेत. तृतकाचे परिवाराला मदत व सुशिक्षित पदवीधर अंशकालीन बेरोजगार मुलाला नोकरी देण्याची आवश्यकता आहे, असल्याची प्रतिक्रीया जांभोरा येथील सरपंच भुपेंद्र पवनकर यांनी दिली.