आणि अपंग विद्यार्थीही धावू लागले...
By admin | Published: December 4, 2015 12:50 AM2015-12-04T00:50:41+5:302015-12-04T00:50:41+5:30
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून तुमसर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात एक दिवसीय क्रीडा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
अपंग दिन : गोळाफेक, दौड स्पर्धा बघून उपस्थित झाले आश्चर्यचकित
तुमसर : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून तुमसर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात एक दिवसीय क्रीडा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अपंग विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. केवळ संधी द्या. संधीचे सोनेच करू, या जिद्दीने स्पर्धेत उतरुन आम्हीही कुठे मागे नाहीत, हे या अपंग विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.
३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या दिनाचे औचित्य साधून अपंगाच्या कलागुणांना उजाळा मिळावा, याकरिता एक दिवसीय क्रीडा सत्र व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक अपंग प्रशिक्षण केंद्रात करण्यात आले. त्या अपंग विद्यार्थी विद्यार्थ्याकरिता ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर दौड स्पर्धा, वेगात चालण्याची स्पर्धा, दोन्ही पाय चांगले व कमरेवरील भागात अपंग विद्यार्थ्यासाठी घेण्यात आली होती.
दोन कुबड्या आणि एक कुबडी असलेल्या विद्यार्थ्यांकरीता धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. याशिवाय व्हिलचेअरवर बसुन गोळाफेक या स्पर्धाही घेण्यात आल्या. या स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन जागतिक अपंग दिनाचे महात्म्य दाखवून दिले.
विजेते ठरलेल्या अपंग विद्यार्थिनीना संस्थेच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सायंकाळी अपंग विद्यार्थ्यांच्ळा मनोरंजनाकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे आर. जी. गायकवाड यांच्या मार्गदशात मुख्याध्यापक सुरेश घडले, सुभाष कांबळे, अर्चना काटकर, यशवंत गणवीर, ईश्वर काळसर्फे, रंजना बडवाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. (शहर प्रतिनिधी)