अन् शेतकऱ्यांनीच जाळले धानपीक
By admin | Published: December 3, 2015 12:44 AM2015-12-03T00:44:49+5:302015-12-03T00:44:49+5:30
आधीच कोरडा दुष्काळ त्यातही शेतकऱ्यांनी कशीबशी शेतीची लागवड केली. परंतु परिसरातील तळे व विहिरी कोरडे पडल्याने सिंचनाअभावी व हवामानाच्या बदलामुळे ...
तुमसर : आधीच कोरडा दुष्काळ त्यातही शेतकऱ्यांनी कशीबशी शेतीची लागवड केली. परंतु परिसरातील तळे व विहिरी कोरडे पडल्याने सिंचनाअभावी व हवामानाच्या बदलामुळे शेतपिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला. परिणामी धानाची उतारी मिळाली नाही.
स्वत:च्या शेतातल्या उभ्या धानपिकाला जाळून परिसरातील १८ गावे ही दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. तुमसर तालुक्यातील चिखला, आष्टी व गर्रा बघेडा जि.प. क्षेत्रात यावर्षी अती अल्प पाऊस पडल्याने परिसरातील शेतकरी प्रभावित झाले होते. सर्वात जास्त कोरड्या दुष्काळाचा फटका चिखला जि.प. क्षेत्रातील चिखला, राजापूर, सीतासावंगी, चिचोली, भोंडकी, मोकोटोला, गुडरी, खंदाळ, सोदेपूर, धामनेवाडा, खैरटोला, गोबरवाही, हेटी, हिरापूर, हमेशा, धुटेरा, घानोड, सक्करदरा, मोहगाव या गावांना बसला.
त्यामुळे परिसरातील १५ हजार हेक्टरवरील शेतजमिनीवर शेतकऱ्यांनी शेतीची लागवडच केली नाही. तर कुठे धानावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाला उतारी मिळालीच नाही. शेतातील धान कापणीला येणारा खर्चही त्या धानाच्या उतारीतून होवू शकत नसल्याने चिखला जि.प. क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून तब्बल ३० एकर शेतातील उभ्या धान पिकाला स्वत:च्या हाताने जाळून घेतले व आतातरी क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या हाताला कामे व कर्जमाफी घोषित करण्याची एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्येशी जाणीव व्हावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. मात्र प्रशासनातर्फे कसलीही कारवाई न झाल्याने प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता शेतकऱ्यांनी स्वमर्जीने धानपिक जाळले. तरी देखील शासनाला जाग येत नसेल तर यास काय म्हणावे?
- संगीता सोनवाने
जि.प. सदस्या, चिखला.